CBSE Exams : 10 वी, 12 वी च्या निकालाबाबत विद्यार्थ्यांनी केली ‘ही’ मागणी

करिअरनामा ऑनलाईन । सीबीएसई बोर्डाच्या टर्म दोनच्या परीक्षा येत्या २६ एप्रिल पासून सुरु होणार आहेत. विद्यार्थ्यांचे गुणपत्रक टर्म १, टर्म २ आणि असेंसमंट यावरून काढण्यात येणार असल्याचे बोर्डाने सांगितले आहे. मात्र आता CBSE च्या १० वी, १२ वी च्या निकालाबाबत विद्यार्थ्यांनी महत्वाची मागणी केली आहे.

CBSE 10वी आणि 12वीचे अंतिम निकाल टर्म 1 किंवा टर्म 2 च्या परीक्षेतील विद्यार्थ्यांच्या सर्वोत्तम कामगिरीवर आधारित असावेत, असे विद्यार्थी आणि शिक्षणतज्ज्ञांच्या एका गटाने म्हटले आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांची मागील दोन शैक्षणिक वर्षे खराब गेली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सध्याच्या बॅचसाठी सूट देण्याची मागणी काही विद्यार्थी, पालक यांनी केली आहे.

गेल्या वर्षी बोर्डाच्या परीक्षा नसल्यामुळे सीबीएसईने यावर्षी दोन परीक्षा घेतल्या आहेत. 26 एप्रिलपासून सुरू होणार्‍या CBSE टर्म 2 परीक्षा, मागील वर्षी अनुक्रमे 9वी आणि 11वीच्या परीक्षेशिवाय पास झालेल्या विद्यार्थ्यांकरता हि प्रथम परीक्षा असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे गुणपत्रक टर्म १, टर्म २ आणि असेंसमंट यावरून काढण्यात येणार असेल तर हे विद्यार्थ्यांवर अन्यायकारक ठरेल असं काही पालकांनी म्हटले आहे.

अनेकांनी मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरसह सोशल मीडिया साइट्सचा वापर करत नवीन मूल्यांकन मॉडेलसाठी मागणी केली आहे. विद्यार्थ्यांनी 50 टक्क्यांपर्यंत अंतर्गत मूल्यांकनाला सर्वाधिक महत्त्व द्यावे आणि उर्वरित 50 टक्के टर्म 1 आणि टर्म 2 मध्ये विभागले जावेत असे सुचवले आहे. बोर्डाने अद्याप यावर आपली प्रतिक्रिया दिलेली नाही.