करिअरनामा ऑनलाईन । “मला लहानपणापासून (Career Success Story) वर्दीचं प्रचंड आकर्षणं होतं. मी चित्रपटात पोलिसाची भूमिका बघताना स्वतःला त्या कलाकारात बघायचो. या वेडापाई मी साऊथचे अनेक ऍक्शन चित्रपट खूपवेळा पाहिले आहेत. भाषा समजत नसली तरी भावना समजून घेत पोलिसांचे अनेक चित्रपट बघितले आहेत. आयुष्यात टार्गेट फक्त आणि फक्त पीएसआय व्हायचं एवढंच होतं. हे माझं वेड मला पोलिस अधिकारी होण्याकडे घेवून गेलं.” ही कहाणी आहे रावसाहेब जाधव यांची.
उपाशी दिस काढले.. वाढप्याचं कामही केलं…
रावसाहेब जाधव हे इंदापूरच्या नीरा-नरसिंगपुर जवळच्या टनु या गावचे रहिवासी आहेत. त्यांचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला. पोलिस अधिकारी व्हायचं हे स्वप्न त्यांनी लहानपणी पाहिलं होतं. अभ्यास करताना समोर टार्गेट फक्त PSI व्हायचं होतं. पुणे विद्यापीठाच्या जयकर अभ्यासिकेत ते अभ्यास करायचे. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने प्रसंगी उपाशी राहून त्यांनी दिवस काढले. अधिकारी (Career Success Story) होण्याचा त्यांचा प्रवास सोपा नव्हता. प्रचंड संघर्षातून उभा राहिलेला हा संघर्ष योद्धा अनेकांसाठी प्रेरणास्थान बनला आहे.
घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. अशा परिस्थितीत उच्च शिक्षण घेणं झेपणारं नव्हतं. त्यामुळे त्यांनी वेळ प्रसंगी केटरींगच्या कामात वाढपी म्हणूनही काम केलं; पण परिस्थितीसमोर कधीच हार मानली नाही.
इंग्रजी कळत नव्हतं
रावसाहेब जाधव सांगतात; ” माझं पहिली ते दहावी पर्यंतच शिक्षण गावातच झालं. दहावीला ८६ टक्के गुण मिळाले म्हणुन अकरावीला सायन्स विषय घेतला घेतलं. पण शिकवणारे सर इंग्रजीत काय बोलतात ते कळत नव्हतं. पण शिक्षणाची गाडी तशीच पुढे ढकलली. 12 वी चा निकाल समाधानकारक लागला नाही. त्यावेळी केवळ ५६ टक्के गुण मिळाले.
वर्दी खुणावत होती (Career Success Story)
ते सांगतात; “आयपीएस विश्वास नांगरे – पाटील यांचा खूप प्रभाव माझ्यावर पडला होता. त्यामुळे एक वैचारिक मांड आणि भविष्यातील योजना मनात पक्की झाली होती. इंग्रजीतलं सायन्स जमत नव्हतं म्हणून इंदापुरला बी. ए. ला प्रवेश घेतला. तिकडंही खूप पोषक वातावरण नव्हतं. पण अर्थशास्त्र विषयातून बी. ए. झालो. आता बी.ए. झालो म्हणून एम. ए. करायचं या उद्देशाने पुण्यात आलो. विद्यापीठांत प्रवेश घेतला. वर्दीचं आकर्षण प्रचंड खुणावत होतं. म्हणून झोकून देऊन एमपीएससीचा अभ्यास केला.”
नापास झालो म्हणून लोकांनी टिंगल केली
आपल्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीविषयी बोलताना ते सांगतात; “MPSC ची परीक्षा देत असताना पहिल्या प्रयत्नात पूर्व परीक्षेत दोन मार्कांनी संधी हुकली. अनेकांनी टिंगल – टवाळी केली. त्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही. जोमाने अभ्यास सुरु ठेवला. पुन्हा परीक्षेच्या दुसऱ्या प्रयत्नात पूर्व परीक्षेत पास आणि मुख्य परीक्षेत नापास झालो. शेवटी तिसरा आणि शेवटचा प्रयत्न केला. यावेळी अभ्यास एवढा सखोल आणि प्रखर (Career Success Story) झाला होता की त्यावेळी मुख्य परीक्षेत कायदा या घटकावर ६० पैकी ६० गुण घेतले. घेतलेल्या कष्टाचं चीज झालं होतं. आणि मी ही परीक्षा पास झालो. पीएसआय फॅक्टरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रयत प्रबोधिनीच्या मॉक इंटरव्ह्यूमध्ये मला उमेश कुदळे सरांनी एक रिमार्क दिला होता की “तुमचा जन्म हा फौजदार होण्यासाठी झाला आहे”. बस त्याच बळावर पुढे गेलो आणि आज अधिकारी झालो.”
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com