Career Success Story : शाळेने बोर्डाची परीक्षा नाकारली; आईने मोबाईल नाल्यात फेकला; कॉल सेंटरमधील मुलगा असा झाला अब्जाधीश 

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । नितीन कामत आणि (Career Success Story) निखिल कामत हे दोघे भाऊ आहेत. नितीन हा निखिलचा मोठा भाऊ आहे. हे दोघे सध्या एका कंपनीचे सह-संस्थापक आणि CFO आहेत. ज्या व्यक्तीला शालेय शिक्षणही पूर्ण करता आले नाही, त्याने शिकण्याची जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर तब्बल 16 हजार पाचशे कोटी रुपयांची कंपनी कशी बनवली; याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

2 भावांनी स्वबळावर सुरु केली कंपनी
झिरोधा ही एक ब्रोकरेज कंपनी आहे. याद्वारे तुम्ही ऑनलाइन डिमॅट खाते उघडून शेअर बाजार, म्युच्युअल फंड आणि इतर गुंतवणूक पर्यायांमध्ये पैसे गुंतवू शकता. भारतातील काही स्टार्टअप्सपैकी हे एक स्टार्टअप आहे, जे मोठ्या प्रमाणात नफा कमवत आहे. झिरोधाने या आर्थिक वर्षात २००० कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, निखिल आणि नितीन कामत या दोन भावांनी ही कंपनी कशी स्थापन केली? खरं सांगायचं तर त्यांनी फायनान्सचं औपचारिक शिक्षणही घेतलेलं नाही. नितीन कामत हा इंजिनियर आहे तर निखिल कामत याने शाळेतूनच शिक्षण अर्धवट सोडलं आहे. यामुळेच त्यांना कंपनी स्थापन करण्यासाठी निधीही मिळाला नाही. आजही बाहेरून एकही पैसा झिरोधामध्ये गुंतवला जात नाही, पण या 2 भावांनी स्वबळावर ही कंपनी स्थापन करून त्यातून मोठ्या प्रमाणात फायदा मिळवला आहे. झिरोधाचे मूल्य सुमारे २ बिलियन डॉलरच्या आसपास आहे.

शाळेने परीक्षेला बसू दिले नाही (Career Success Story)
निखिल कामत याने वयाच्या 14 व्या वर्षी सेकंड हँड फोन विकायला सुरुवात केली. यामुळे त्याच्या अभ्यासावर परिणाम झाला. हा प्रकार त्याच्या आईला कळताच तिने सर्व फोन नाल्यात फेकून दिले. त्याच्या अभ्यासाबाबतच्या निष्काळजीपणाचा शाळा प्रशासनालाही राग होता, त्यामुळे त्याला दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेला बसण्याची संधीही देण्यात आली नाही. यानंतर निखिलने शाळा सोडली.

कॉल सेंटरमध्ये केले काम
वयाच्या १७ व्या वर्षी त्याने एका कॉल सेंटरमध्ये काम करायला सुरुवात केली, जिथे त्याला ८,००० रुपये पगार मिळायचा. निखिल सांगतो की, “मी कॉल सेंटरमध्ये संध्याकाळी ४ ते पहाटे १ वाजेपर्यंत काम करायचो आणि सकाळी मी ट्रेडिंगमध्ये माझं नशीब आजमावायचो.” यादरम्यान त्याने मार्केटबद्दल बरेच काही जाणून घेतले.

अशी लाँच झाली ‘झिरोधा’
त्याच्या वडिलांनी त्याला भक्कम पाठिंबा दिला. त्यांनी आपल्या जवळील पैसे मुलाला शेअर बाजारात गुंतवण्यासाठी दिले. निखिलने आपल्या कॉल सेंटरमधील सहकाऱ्यांना त्यांच्या (Career Success Story) पैशांचे व्यवस्थापन शेअर मार्केटमध्ये कशा पद्धतीने करायचे याचे महत्त्व पटवून दिले. अशाप्रकारे स्टॉक ब्रोकिंगमध्ये त्याच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. 2010 मध्ये त्याने आपल्या भावाला बरोबर घेवून ‘झिरोधा’ लाँच केली आणि २०२१ मध्ये निखिल कामत वयाच्या 34 व्या वर्षी अब्जाधीश झाला.

कंपनीने कमावला 2094 कोटी रुपयांचा निव्वळ नफा 
झिरोधाला कोणीही निधी दिला नाही आणि आजही बाहेरून एकही पैसा कंपनीत गुंतवला जात नाही. असे असूनही आज झिरोधा ही १६,५०० कोटी रुपयांचं भागभांडवल असलेली कंपनी आहे. निखिल कामतने गेल्या वर्षीच्या हुरुन इंडिया सेल्फ-मेड रिच लिस्टमध्ये अव्वल स्थान पटकावले होते. एका रिपोर्टनुसार निखिल कामतची एकूण संपत्ती १७,५०० कोटी रुपये आहे. या आर्थिक वर्षात कंपनीने २०९४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com