Career Success Story : याला जिद्द ऐसे नाव!! आर्थिक परिस्थितीला झुकवत भाजी विक्रेत्याची मुलगी बनली जज; वाचा एक प्रेरणादायी प्रवास

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। बिकट आर्थिक परिस्थितीसमोर हार न मानता यशाची शिखरं गाठणाऱ्या अनेक (Career Success Story) विद्यार्थ्यांबाबत आपण आतापर्यंत ऐकलं असेल. त्यांच्या यशोगाथाही वाचल्या असतील. मात्र आज आम्ही तुम्हाला जिच्याबद्दल सांगणार आहोत, तिचा संघर्षमय प्रवास वाचून तुमचा ऊर अभिमानाने भरून येईल. मध्यप्रदेशातील इंदौर इथे राहणाऱ्या अंकिता नागरने केवळ स्वतःच्या कुटुंबाची नव्हे तर संपूर्ण इंदौरची मान उंचावली आहे. अंकिताने कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीवर मात करत दिवाणी न्यायधीश पदाची परीक्षा पास केली आहे. अंकिता नागरने दिवाणी न्यायाधीश परीक्षेत SC कोट्यातून 5 वा क्रमांक मिळवला आहे.

आई – वडील भाजी विकून घर चालवतात

अंकिताचे वडील हे इंदौरमध्येच भाजी विकतात तर तिची आईसुद्धा त्यांना या कामात मदत करते. तिचे वडील पहाटे पाच वाजता उठतात आणि मंडईला जातात. आई सकाळी आठ वाजता सगळ्यांसाठी जेवण बनवते आणि भाजीच्या गाडीवर जाते. तेथे दोघे भाजी विकतात. मोठा भाऊ आकाश वाळू बाजारात मजुरीचे काम करतो. धाकट्या बहिणीचे लग्न झाले आहे. कुटुंबाच्या अशा बिकट आर्थिक परिस्थितीत अंकिताला तिच्या घरच्यांनी अभ्यासासाठी सतत प्रोत्साहन दिलं.

भाजीच्या गाडीवर दिली आनंदाची बातमी (Career Success Story)

दिवाणी न्यायधीश परीक्षेचा निकाल जाहीर झाला तेव्हा तिच्या कुटुंबात मृत्यूची घटना घडली होती. त्यामुळे तिच्या कुटुंबातील सर्वजण इंदोरच्या बाहेर होते. घरात गंभीर वातावरण होते. त्यामुळे अंकिताने लगेच कोणालाही निकाल जाहीर झाल्याची बातमी दिली नाही. मात्र काही दिवसांनंतर अंकिताने थेट भाजीच्या गाडीवर जाऊन आईला आणि वडिलांना ती जज झाल्याबद्दल माहिती दिली.

प्रसंगी भाजीही विकली

कुटुंबाच्या बिकट आर्थिक परिस्थितीवर मात करत अंकिताला अभ्यास करायचा होता. यासाठी तिला कुटुंबातील प्रत्येकाकडून नेहमी प्रोत्साहन मिळत होते. तिनेही कुटुंबाला हातभार लावत अभ्यासासाठी वेळेचे योग्य नियोजन केले होते. अंकिताने सांगितले की, ती अभ्यासासाठी दिवसातून 8 तास वेळ देत असे. संध्याकाळी भाजीच्या गाडीवर गर्दी झाली की ती भाजी विकायला मदत करायची. आई – वडिलांसोबत अंकितासुद्धा भाजी विक्रीच्या कामात मदत करत असे. रात्री दहा वाजता सगळेजण दुकान बंद करून घरी यायचे. मग ती रात्री अकरा वाजल्यापासून पुन्हा अभ्यासाला बसायची.

दोनवेळा अपयश येवूनही जिद्द सोडली नाही

अंकिताच्या कॉलेजची फी भरण्यासाठी तिचे वडील कर्ज काढायचे. कॉलेज संपल्यानंतर ती सतत दिवाणी न्यायाधीशपदाच्या अभ्यासाच्या तयारीत गुंतली असायची. अंकिताचे प्रयत्न सुरु होते; मात्र दुर्दैवाने (Career Success Story) तिला या परीक्षेत दोनवेळा अपयशाचा सामना करावा लागला. या अपयशामुळे निराश झालेल्या अंकिताला तिच्या पालकांनी सतत प्रोत्साहन दिले. पालकांच्या प्रोत्साहनामुळे अंकितामधील जिद्द कायम राहिली. त्यामुळेच परीक्षेत दोनवेळा अपयश येऊनही जिद्द, मेहनत आणि योग्य नियोजनाच्या जोरावर अंकिताने दिवाणी न्यायाधीश परीक्षेच्या तिसऱ्या प्रयत्नात यश खेचून आणले.

‘कर्ज काढले… पण अभ्यास थांबू दिला नाही’

अंकिताने मिळवलेल्या यशाबद्दल बोलताना तिची आई सांगते, “आमची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. अशा परिस्थितीत अंकिताच्या कॉलेजची फी, अभ्यासासाठी लागणाऱ्या पुस्तकांचा खर्च भागवण्यासाठी आम्हाला अनेक वेळा कर्ज घ्यावे लागले पण तिचा अभ्यास आम्ही थांबू दिला नाही. अंकिता अभ्यासातून वेळ काढून आम्हाला भाजी विक्रीच्या कामात मदत करत असे. अशा परिस्थितीत तिने जिद्द सोडली नाही. तिने घेतलेल्या कष्टाचे आज चीज झाले आहे. अंकिता जज पदाची धुरा सांभाळणार असल्याने आमचा ऊर अभिमानाने भरून आला आहे. भविष्यात तिच्या हातून योग्य आणि निःपक्षपातीपणे न्याय – निवाडा करण्याचे काम व्हावे; हीच आमची इच्छा आहे.”

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com