करिअरनामा ऑनलाईन । IIT दिल्लीतून शिक्षण पूर्ण करताच (Career Success Story) अभिषेक यांना थेट परदेशात नोकरी मिळाली. सिंगापूरमधील बार्कलेज इन्व्हेस्टमेंट बँकेत त्यांनी बड्या पगारावर नोकरी केली आहे. त्यानंतर काही काळ लंडनमधील बँकेतही नोकरी केली. त्यानंतर त्यांनी आपला स्टार्टअप सुरू केला, ज्यासाठी ते दक्षिण अमेरिकेत राहत होते. तिथे काम करत असताना त्यांना आपल्या आयुष्यात काहीतरी कमतरता असल्याची जाणीव झाली आणि त्यांनी मायदेशी परत येण्याचं ठरवलं. त्यांनी अमेरिका सोडली आणि ते 2014 मध्ये मायदेशी परतले. इथूनपुढे सुरु झाली स्वप्न पूर्ण करण्याची धडपड… आम्ही बोलत आहोत अभिषेक सुराणा यांच्याबद्दल….
सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा
ही एका सामान्य कुटुंबातील मुलाची कथा आहे. 12वी नंतर जेईई (JEE) परीक्षा उत्तीर्ण होऊन अभिषेक यांनी आयआयटी (IIT) दिल्लीत प्रवेश मिळवला. या गुणवत्तेवर त्यांना सिंगापूर आणि लंडनमध्ये मोठ्या पॅकेजच्या नोकऱ्या मिळाल्या. पण तेथे त्यांचे मन रमले नाही. त्यांना समाजाची सेवा करायची होती यासाठी त्यांनी भारताच्या नागरी सेवेत सामील होण्याचा निर्णय घेतला आणि संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा फॉर्म भरला.
वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवली (Career Success Story)
अभिषेक सुराणा हे राजस्थानमधील भिलवाडा येथील रहिवासी आहेत. त्यांनी लहानपणापासून आपल्या वडिलांना खूप कष्ट करताना पाहिले आहे त्यामुळे त्यांनी कधीच अभ्यासाकडे दुर्लक्ष केले नाही. अभ्यासासोबतच ते इतर उपक्रमांमध्येही खूप सक्रिय होते. अशा गुणी मुलाची शाळेत असताना हेड बॉय या पदावर निवड झाली होती. 12वी बोर्डाच्या परिक्षेत चांगले मार्क मिळवल्यानंतर त्यांनी JEE परीक्षा दिली. त्यानंतर त्यांनी आयआयटी दिल्लीतील इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग शाखेत प्रवेश घेतला आणि बी.टेकची पदवी मिळवली.
‘…म्हणून भारतात परत येण्याचं ठरवलं’
लाखो कोटींचे पॅकेज असूनसुध्दा अनेकजण परदेशातील नोकऱ्या सोडून भारतात परततात; हे आपल्या मायभुमितील सरकारी नोकरीविषयी असणारे आकर्षण म्हणावं लागेल. अभिषेक यांच्याबाबतही असंच काहीसं घडलं. दक्षिण अमेरिकेत राहून नोकरी करत असताना त्यांना आपल्या आयुष्यात काहीतरी कमी असल्याची जाणीव झाली आणि त्यांनी भारतात परत येण्याचं ठरवलं. नागरी सेवेत सामील होण्यासाठी त्यांनी UPSC परीक्षा दिली. या प्रवासात त्यांना अपयश आलं खरं पण त्यांनी हार मानली नाही. जिद्दीच्या जोरावर त्यांची आपल्या ध्येयाकडे वाटचाल सुरु होती.
UPSC परिक्षेत टॉपर ठरले आणि बनले IAS
यूपीएससी परीक्षेत दोन वेळा अपयशी ठरल्यानंतरही अभिषेक यांनी हार मानली नाही. त्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात ते 250 वी रँक मिळवून आयपीएस (IPS) अधिकारी बनले. पण त्यांचे (Career Success Story) ध्येय स्पष्ट होते. त्यांना आयएएस (IAS) अधिकारीच व्हायचे होते. त्यामुळे पोलीस प्रशिक्षणासोबतच त्यांनी यूपीएससीची चौथ्या वेळेस परीक्षा दिली. 2018 मध्ये झालेल्या परिक्षेत त्यांनी संपूर्ण भारतातून 10 वी रॅंक मिळवली आणि ते या परिक्षेत टॉपर ठरले. या रॅंकमुळे ते IAS अधिकारी बनले आणि त्यांचे नागरी सेवेत सामील होण्याचे स्वप्न पूर्ण झाले.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com