Business Success Story : मुंबईत आले.. चाळीत राहिले.. एक भन्नाट आयडिया आणि उभी राहिली 400 कोटींची कंपनी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । रघुनंदन श्रीनिवास कामत यांना भारतीय (Business Success Story) लोकांची मिठाई खाणीची क्रेझ माहीत होती. म्हणूनच 1984 साली मुंबईत त्यांनी या बिझनेसची सुरुवात केली होती. त्यांनी आपल्या भावाच्या दक्षिण भारतीय रेस्टॉरंटमध्ये बराच काळ काम केले, यावेळी त्यांना समजले की, अनेकांना जेवणानंतर मिठाई खायला आवडते. ही कल्पना कामत यांच्या कामाची ठरली. कामत यांनी गरमागरम आणि मसालेदार पदार्थानंतर काहीतरी थंड पदार्थ सर्व्ह करायचे ठरवले आणि लोकांना ही कल्पना आवडू लागली.

आज आम्ही तुम्हाला अशा व्यक्तीबद्दल सांगणार आहोत, ज्याने आपल्या कठोर मेहनतीने 400 कोटी रुपयांची कंपनी बनवली आहे. ही यशोगाथा आहे ‘नॅचरल्स आइस्क्रीम’ ब्रँडची. रघुनंदन श्रीनिवास कामत (Raghunandan Srinivas Kamath) यांनी 1984 मध्ये मुंबईत याची सुरुवात केली. कामत यांनी नॅचरल्स आइस्क्रीम प्रत्येक घरात पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी इतके यश कसे मिळवले आणि त्याची कंपनी एवढी कशी वाढवली हे आपण जाणून घेवूया…

4 लोकांना सोबत घेवून सुरु केली कंपनी
रघुनंदन यांचे वडील कर्नाटकातील मंगळूर जिल्ह्यात आंब्याचा व्यापार करायचे. योग्य फळे निवडून ते कसे जतन करायचे हे तंत्र रघुनंदन यांनी आपल्या वडिलांकडून शिकले. अनेक वर्षे वडिलांच्या सान्निध्यात राहिल्यानंतर तेही फळांचा माल उचलायला शिकले आणि व्यवसाय करण्याच्या उद्देशाने ते मुंबईला आले. संघर्षाच्या काळात ते मुंबईमध्ये एका चाळीत वास्तव्य करत होते. फळांचा व्यापार करत असताना 1984 मध्ये रघुनंदन यांनी मुंबईतील जुहू येथे ‘नॅचरल्स’ नावाचे त्यांचे पहिले आइस्क्रीम स्टोअर उघडले. त्यावेळी त्यांनी केवळ चार लोक आणि काही फ्लेवर्सचे आइस्क्रीम घेऊन कंपनी चालू केली.

आइस्क्रीम सोबत पावभाजी देण्याची आयडिया (Business Success Story)
रघुनंदन यांच्या जुहूच्या आइस्क्रीम पार्लरमध्ये पूर्वी फार कमी लोक यायचे. मनासारखा धंदा होत नव्हता. त्यांना ग्राहकांची कमतरता सतावत होती. त्यामुळे त्यांनी यावर एक उपाय शोधला. रघुनंदन आइस्क्रीमसोबत चटकदार पावभाजी बनवू लागले. त्यामुळे काय होवू लागलं की, पावभाजी खाण्यासाठी लोक कामत यांच्याकडे येवू लागले आणि एकाच ठिकाणी आइसक्रीम मिळत असल्याने लोक कामत यांचे गोड आणि थंडगार आइस्क्रीम पसंत करू लागले. फक्त साखर, दूध आणि फळे वापरून हे आइस्क्रीम बनवले जायचे; हे कामत यांच्या आइस्क्रीमचे खास वैशिष्ट्य होते. त्यामुळे लोकांचा हळूहळू त्यांच्यावर विश्वास बसू लागला. रघुनंदन यांच्या पार्लरमध्ये हळुहळू गर्दी वाढू लागली.

छोटा पॅकेट बडा धमाका
पहिल्या वर्षी, कामत (Raghunandan Srinivas Kamath) यांनी जुहूच्या कोळीवाडा भागात 200 चौरस फुटांच्या छोट्या दुकानातून सुमारे 5 लाख रुपये कमावले. पण त्यांना केवळ आईस्क्रीमचा धंदा विकसित करायचा होता. एक वर्षानंतर त्यांनी आइस्क्रीमचा पूर्ण ब्रँड तयार करण्यासाठी पावभाजी विकणे बंद केले. आता कामत यांच्या सहा टेबल्सच्या रेस्टॉरंटमध्ये फ्रोझन आइस्क्रीमचे पाच फ्लेवर्स होते. यामध्ये कस्टर्ड-ऍपल, काजू-मनुका, चॉकलेट, आंबा आणि स्ट्रॉबेरी फ्लेवर्ड आईस्क्रीमचा समावेश होता.

करोडोंत होते उलाढाल
आज नॅचरल्स आइस्क्रीम देशभरात 135 पेक्षा जास्त स्टोअरमध्ये उपलब्ध आहे. जॅकफ्रूट, टेंडर कोकोनट, ब्लॅक जामुन यासह 20 फ्लेवर्सचे आइस्क्रीम आउटलेटवर उपलब्ध आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नॅचरल्स आईस्क्रीमची उलाढाल 400 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. जवळपास चार दशकांपासून रघुनंदन कामत यांनी आपल्या आइस्क्रीमची खासियत कायम ठेवली आहे. नॅचरल्स हे नावाप्रमाणेच नॅचरल ये. येथे तयार होणाऱ्या आइसक्रीममध्ये कोणतेही रंग किंवा रसायन मिसळले जात नाही. कामत यांचे आईस्क्रीम पूर्णपणे नैसर्गिक घटकांपासून तयार केलेले असते. हा विश्वास त्यांनी अनेक वर्षापासून जपला आहे त्यामुळे लोक नुसत्या नावाने या ब्रॅंडकडे खेचले जातात.

अशा पद्धतीने ब्रॅंड घराघरात पोहचला
प्रत्येक घरापर्यंत नॅचरल्स आइस्क्रीमचा ब्रॅंड पोहोचवण्यासाठी कामत यांनी अनेक गोष्टींचा बारकाईने अभ्यास केला. नैसर्गिक पद्धतीने आइसक्रीम बनवण्यासाठी ते चांगल्या प्रतीची फळे निवडायचे. या (Business Success Story) कामात त्यांची आई त्यांना मदत करत असे. तसेच आइसक्रीम चाखल्यानंतर ग्राहक जे बदल सुचवायचे याचा देखील कामत यांनी गांभिर्याने विचार केला. कामत यांच्या अशा प्रयत्नांमुळे नॅचरल्स आईस्क्रीमने ग्राहकांच्या हृदयात स्थान निर्माण केले. नॅचरल आईस्क्रीमचे शेकडो कर्मचारी दररोज २० टन आइस्क्रीमचे उत्पादन करतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com