मुंबई | सरकारी विभागांच्या विविध पदांची भरती महापरिक्षा पोर्टलद्वारे करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली आहे. या पोर्टलविषयी ‘एमपीएससी स्टुडंट राईट्स’ या संघटनेने समाजमाध्यमावर घेतलेल्या ऑनलाईन मतचाचणीत तब्बल ४४ हजार ४७७ उमेदवारांनी आपले मत व्यक्त केले आहे. यात ८७.२ टक्के उमेदवारांनी हे पोर्टल बंद करण्याबाबत कौल दिला आहे; तर १२.८ टक्के उमेदवारांनी सुधारणा करून पोर्टल पुन्हा सुरू करण्याकरिता कौल दिला आहे.
महापरिक्षा पोर्टलमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत परीक्षार्थींनी ते बंद करण्यासाठी एल्गार पुकारला होता. स्पर्धा परीक्षांना सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी याविरोधात आवाज उठवल्याने लोकप्रतिनिधींनीही पोर्टल बंद करण्याची मागणी सरकारकडे केली. त्यानुसार मुख्यमंत्री ठाकरे यांनी या पोर्टलला स्थगिती दिली.
दरम्यान याबाबत स्टुडंट राईट्स संघटनेने ५ ते १० जानेवारी या कालावधीत समाजमाध्यमावर या पोर्टलविरोधात मोहिम राबवली. तिला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. या मोहिमेद्वारे ‘एमपीएससी’शी संबंधित प्रश्नांवर विद्यार्थ्यांची मते घेण्यात आली. राज्यातील ४४ हजार ४७७ विद्यार्थ्यांनी या लिंकवर आपली मते व्यक्त केली.