करिअरनामा ऑनलाईन । डिजिटल जमान्यात तुम्हाला नोकरीसाठी (Interview Tips) मुलाखत ऑनलाईन द्यायची असो किंवा ऑफलाईन, तुम्हाला यासाठी आधीपासूनच जोरदार तयारी करायला हवी. जर तुम्हीही नोकरी शोधताय आणि मुलाखतीची तयारी करत आहात तर हा लेख तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. आज आपण जाणून घेवूया नोकरी मिळवताना ज्यावेळी तुम्ही एखाद्या मुलाखतीसाठी जात असता तेव्हा कोणकोणत्या प्रश्नांची तयारी करणं आवश्यक आहे याविषयी…. आज आपण असे काही प्रश्न जाणून घेणार आहोत जे मुलाखतीच्या वेळी हमखास विचारले जातात. हे प्रश्न वाचून आतापासूनच तुम्ही मुलाखतीची तयारी करु शकता.
1. आम्हाला तुमच्याविषयी सांगा (Interview Tips)
हा प्रश्न सर्वात जास्त विचारला जाणारा अत्यंत सामान्य प्रश्न आहे. अनेकजण हा अत्यंत सोपा प्रश्न समजून या प्रश्नाची नीट तयारी करून जात नाही पण तुम्ही तसे करू नका. तुमच्याविषयी आणि तुम्ही नोकरीसाठी का योग्य आहेत, हे या उत्तरात सांगा. कामाव्यतिरिक्त इतर गोष्टी, तुमच्या आवडी निवडी, सध्या तुम्ही काय काम करत आहात आणि कोणत्या जबाबदारी पार पाडत आहात तसेच तुमचा अनुभव आणि तुम्ही या नोकरीसाठी का योग्य आहात याविषयी सांगा.
तुम्ही या नोकरीसाठी कसे योग्य आहात?
तुमच्यामध्ये असलेली क्षमता आणि कौशल्ये सिध्द करण्यासाठी हा प्रश्न योग्य आहे. या प्रश्नाचे उत्तर देताना तुम्ही तुमची कौशल्ये, अनुभव आणि कंपनीसाठी तुम्ही कसे योग्य आहात याविषयी सांगू शकता. याविषयी बोलताना तुम्ही भूतकाळात केलेल्या चांगल्या कामाची उदाहरणे द्या. तुम्ही फक्त काम करत नाही तर त्याचा चांगला परिणाम घडवून आणता, याविषयी सांगा. टिममध्ये काम करण्यास तुम्ही सक्षम आहात, हे तुमच्या उत्तरायतून सिध्द करा.
तुम्हाला इथे नोकरी करण्याची इच्छा का आहे?
हा प्रश्न विचारण्यामागे मुलाखतकाराचा उद्देश तुम्हाला (Interview Tips) कंपनीविषयी किती माहिती आहे, याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न असतो. या प्रश्नाचे प्रभावी उत्तर देण्यासाठी मुलाखतीला येण्यापूर्वी कंपनीविषयी जाणून घ्या. या प्रश्नाचे उत्तर देताना कंपनीची वैशिष्ट्ये सांगा. तसेच कंपनीचा सुरूवातीपासून कसा विकास झाला आणि तुम्ही या कंपनीसाठी कसे योगदान देऊ शकता, या तपशीलावर भर द्या.
येणाऱ्या काळात तुमची ध्येय कोणती आहेत?
या प्रश्नाद्वारे तुमचे ध्येय कोणती आहेत आणि तुम्ही स्वत:च्या विकासाकडे कसे बघता, हे जाणून घेण्याचा मुलाखतकाराचा प्रयत्न असतो. या प्रश्नाचे उत्तर देताना तुमचे उद्दीष्टे आणि ध्येय स्पष्ट करा. त्यासाठी तुम्ही कोणती मेहनत घेणार आहात आणि अनुभवाच्या जोरावर वर्तमानकाळात आणि भविष्यात कसे काम करणार आहात; याविषयी सांगा.
तुमच्या चांगल्या आणि वाईट गोष्टी कोणत्या?
तुम्ही केलेल्या चांगल्या कामाची उदाहरणे द्या. या प्रश्नाचे उत्तर देताना आणि तुमच्या चांगल्या गोष्टी सांगताना नेहमी तुमच्यामधील चांगल्या गुणांना समोर आणा. उदा. तुम्ही खूप लवकर कोणतीही समस्या सोडवत असाल तर एखादे उदाहरण द्या.
तुमच्यामध्ये असलेल्या वाईट गुणांविषयी बोलताना तुम्ही या गोष्टी सुधारणार आहात याविषयी आवर्जून सांगा. तुम्ही कठीण परिस्थिती कशी हाताळता हे जाणून घेण्याचा मुलाखतकाराचा उद्देश असतो.
तुम्हाला किती पगाराची अपेक्षा आहे?
हा एकदम कोड्यात टाकणार प्रश्न. अनेकदा आपण सर्व प्रश्नांची (Interview Tips) उत्तरे नीट देतो पण पगाराविषयी जेव्हा विचारले जाते तेव्हा अनेकजण याबाबत बोलताना अडखळतात. समोर आलेली नोकरीची संधी हातातून जावू नये यासाठी अनेक जण मिळेल तो पगार स्वीकारतात आणि कधी कधी स्वतःचं नुकसान करून घेतात. पण मुलाखतीला जाण्यापूर्वी पगाराविषयी काय सांगायचे याचा विचार करा. त्यासाठी तुमचा अनुभव, तुमच्यामध्ये असलेली क्षमता आणि त्यानुसार तुमचा पगार किती असावा, याचे अवलोकन करा आणि उत्तर तयार ठेवा म्हणजे ऐनवेळी हा प्रश्न समोर आला तर तुम्ही कोड्यात पडणार नाही.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com