करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने टंकलेखन (MPSC Typing Skill Exam) कौशल्य चाचणीसाठी नवी कार्यपद्धती जाहीर केली आहे. लिपिक-टंकलेखक, कर सहाय्यक या टंकलेखन आवश्यक असलेल्या पदांच्या परीक्षांसाठी ही कार्यपद्धती असणार आहे.
त्यानुसार लिपिक-टंकलेखक पद भरतीत मुख्य परीक्षेसाठी (MPSC Typing Skill Exam) उमेदवारांना मराठी किंवा इंग्रजी यापैकी एक टंकलेखन कौशल्य चाचणी निवडता येणार आहे. तसेच कर सहाय्यक पदासाठी दोन्ही भाषांतील टंकलेखन कौशल्य चाचण्या द्याव्या लागणार आहेत. दोन्ही पदांसाठी टंकलेखन कौशल्य चाचणी अहर्ताकारी स्वरूपाची केली आहे. MPSCने या संदर्भात माहितीपत्रक काढले आहे. लिपिक-टंकलेखक, कर सहाय्यक या पदांच्या सेवाप्रवेश नियमातील तरतुदी आणि अन्य बाबींचा साकल्याने विचार करून कार्यपद्धती जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार लिपिक-टंकलेखक, कर सहाय्यक पदाच्या पदभरतीत संगणक प्रणालीवर (On a Computer System) आधारित टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्यात येणार आहे.
पात्रता निकष (MPSC Typing Skill Exam)
लेखी परीक्षेच्या आधारे संबंधित पदांसाठी भरल्या जाणाऱ्या पदांच्या तीनपट उमेदवार टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी पात्र ठरवले जातील. ही कार्यपद्धती यापुढे होणाऱ्या टंकलेखन कौशल्य चाचणीला लागू असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
अपंग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांना नियुक्ती मिळाल्यास टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षांचा कालावधी आणि दोन संधी लागू असल्याने या वर्गातून आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांना टंकलेखन चाचणी अनिवार्य नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com