करिअरनामा ऑनलाईन । नुकताच UPSC चा निकाल जाहीर झाला आहे. (UPSC Success Story) यंदा एकूण 685 उमेदवार उत्तीर्ण झाले असून, त्यात महाराष्ट्रातल्या 40 हून अधिक उमेदवारांचा समावेश आहे. या 40 जणांपैकीच एक आहे उदगीर तालुक्यातील हंडरगुळी या गावातील तरुण रामेश्वर सब्बनवाड असं म्हणतात जिद्द असली की आयुष्यात काहीच अशक्य नसतं. अशीच काहीशी प्रेरणादायी कहाणी आहे रामेश्वरची.
वडील चालवतात किराणा दुकान तर आई करते मजुरी
नुकत्याच जाहीर झालेल्या UPSC परीक्षेत रामेश्वरने संपूर्ण भारतातून 202 रँक मिळवली आहे. मात्र ही रँक मिळवणं त्याच्यासाठी इतकं सोपं नव्हतं. रामेश्वरच्या वडिलांकडे एक जमिनीचा तुकडा आहे. तो सुद्धा अपुरा. तो जमिनीचा तुकडा कसून घर खर्च भगत नाही म्हणून रामेश्वरचे वडील हे किराण्याचं दुकान चालवतात तर कुटुंबाला हातभार लावण्यासाठी रामेश्वराची आई शेतमजुरी करते. त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती तशी गंभीरच म्हणावी लागेल. मात्र अशा परिस्थितीतही न डगमगता रामेश्वरने आपला UPSC चा अभ्यास सुरूच ठेवला.
प्रसंगी शिकवणीही घेतली
रामेश्वरचं संपूर्ण प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावात म्हणजे हंडरगुळी येथे झालं. पाचवी ते दहावीपर्यंतचं शिक्षण लातूर जिल्ह्यात नवोदय विद्यालयात झालं. मात्र यानंतर उच्च शिक्षणासाठी रामेश्वरला पुण्यात यावं लागलं. पुण्यात शासकीय महाविद्यालयातून त्याने सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. या पदवीवर त्याला नोकरी मिळाली. काही महिने त्याने खासगी नोकरी केली. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढत होत्या. आर्थिक चणचण कमी करण्यासाठी त्याने काही महिने मुलांना शिकवणी देण्याचंही काम केलं आणि त्यातून पैसे कमवले.
“आईची इच्छा पूर्ण झाली”
रामेश्वर आणि त्याचे कुटुंब मेहनत घेत होते. मात्र हे सर्व काम करत असताना, मुलानं चांगलं शिकून कलेक्टर व्हावं अशी इच्छा त्याच्या आईची होती. म्हणूनच रामेश्वरनं UPSC परीक्षेची तयारी सुरु केली. 2020 मध्ये रामेश्वरने अखंड मेहनत करून मुलाखतीपर्यंत पोहोचण्यात यश मिळवलं. मात्र 6 मार्क कमी मिळाल्यामुळे पदरी निराशा आली. तरी तो खचला नाही. त्याने मनाशी निर्धार केला आणि UPSC परीक्षेचा फॉर्म पुन्हा एकदा भरला. कठोर परिश्रम घेऊन त्याने UPSC ची परीक्षा क्रॅक करत इतिहास घडवला. रामेश्वरने केवळ दुसऱ्याच प्रयत्नात IAS पदापर्यंत मजल मारली आहे.
‘त्याने उलगडलं यशाचं रहस्य’ (UPSC Success Story)
रामेश्वरनं इंजिनीयरिंग केलं होतं. पण वैकल्पिक विषय राज्यशास्त्र असल्यानं त्याला अभ्यासादरम्यान थोडा त्रास झाला. कोरोनामुळे सगळे क्लासेस ऑनलाईन झाले. युट्यूबसारख्या ऑनलाईन माध्यमांचादेखील त्याला फायदा झाला. त्याने यापूर्वी अधिकारी झालेल्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचं अवलोकन केलं. खूप मॉक टेस्ट दिल्या, अशा शब्दांत रामेश्वरनं त्याच्या यशाचं रहस्य उलगडलं. अधिकारी होण्यासोबतच इतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा मानस त्याने व्यक्त केला आहे.
2018 मध्येच केला होता निर्धार
रामेश्वरचा इथपर्यंत येण्याचा प्रवास सोपा नव्हता. 2018 साली काही आजारामुळे रामेश्वरला ICU मध्ये दाखल करण्याची वेळी आली होती. त्यावेळी आरोग्य यंत्रणेची व्यवस्था बघून त्याने ही यंत्रणा सुधरवण्याचा आणि ग्रामीण भागातील तरुणांना यामुळे रोजगार उपलब्ध करून देण्याचा निर्धार केला होता. प्रशासकीय सेवेत जाऊन आपल्याला हे बदल करता येतील हि गोष्ट त्याच्या लक्षात आली होती. त्यामुळे दवाखान्यात उपचार घेत असतानाच रामेश्वरने प्रशासकीय सेवेत दाखल होण्याचे स्वप्न पहिले होते. रामेश्वरचा खडतर प्रवास आणि त्यावर मत करून त्याने मिळवलेले यश आजकालच्या तरुण मुलामुलींसाठी प्रेरणादायी आहे.
गावकऱ्यांचा जल्लोष
रामेश्वर ज्या गावातून येतो ते हळी हंडरगुळी हे बैल बाजारासाठी प्रसिद्ध असलेले गाव आहे. या गावचे पहिले IAS अधिकारी होण्याचा मान रामेश्वर याला मिळाला आहे. ही बाब समजताच हाळी हंडरगुळी येथे जल्लोष करण्यात आला व रामेश्वर यांच्या वडिलांवर शुभेच्छांचा वर्षाव झाला. एक सामान्य किराणा दुकानदार मुलाला IAS करू शकले; यासाठी त्यांचे तालुक्यातून कौतुक करण्यात येत आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com