UPSC Success Story : या महिला IAS ने गरोदर असताना नोकरी करत UPSC दिली; जाणून घ्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । दरवर्षी लाखो उमेदवार यूपीएससीची (UPSC Success Story) पूर्व आणि मुख्य परीक्षेची तयारी करत असतात. गेल्या अनेक वर्षांतील आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या यशोगाथा देशातील अनेक उमेदवारांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत. यापैकीच एक कथा आहे आयएएस पद्मिनी नारायण (IAS Padmini Narayan) यांची, ज्यांनी कठीण परीक्षांपैकी एक परीक्षा पास केली आहे. आज त्या IAS पदाची धुरा खंबीरपणे सांभाळत आहेत. पद्मिनी यांचं कौतुक करेल तेवढं थोडंच आहे. कारण त्यांनी गरोदर असताना पूर्णवेळ नोकरी करत सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची तयारी केली आहे. त्यांच्यातील उमेद संकटांपासून लांब पळणाऱ्या देशातील अनेक तरुण-तरुणींना निश्चितच प्रेरित करेल.

शाळा ते पदव्युत्तर पदवी
पद्मिनी दिल्लीच्या रहिवासी आहेत. दिल्ली पब्लिक स्कूल, आर. के. पुरममधून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी 2010 मध्ये गुरु गोबिन सिंग इंद्रप्रस्थ विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. याशिवाय 2011-2013 या वर्षात त्यांनी मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट, गुरुग्राममधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.

दुसऱ्या प्रयत्नात UPSC मध्ये मिळाले यश (UPSC Success Story)
पद्मिनी या नोकरी करत असताना त्यांच्या मनात सरकारी अधिकारी होण्याचा विचार आला. त्यावेळी त्यांनी UPSC परीक्षेचा फॉर्म भरला. पहिल्या वर्षी त्यांना अपयशाचा सामना करावा लागला; पण त्यांनी हार न मानता पुन्हा अभ्यासाला सुरवात केली. UPSC CSE 2019 मध्ये त्यांनी दुसऱ्यांदा परीक्षा दिली. यावेळी त्यांनी संपूर्ण भारतातून 152 वा क्रमांक मिळवला होता. त्यांनी पाहिलेलं स्वप्न अखेर पूर्ण झालं आणि त्यांची IAS अधिकारी पदावर वर्णी लागली.

गरोदरपण; आरोग्य आणि अभ्यास
नोकरी करत असताना पद्मिनी यांची UPSC ची तयारी सुरु होती. विशेष म्हणजे गरोदर असताना त्यांनी ही परीक्षा देण्याचे धाडस केले. घर, नोकरी, अभ्यास अशी कसरत सुरु असताना त्यांनी तब्येतीकडे पूर्ण लक्ष दिल्याचे त्या सांगतात. त्या दररोज 25-30 मिनिटांचा ब्रेक घ्यायच्या आणि तिच्या खाण्यापिण्याकडे पूर्ण लक्ष द्यायच्या. पद्मिनी (IAS Padmini Narayan) यांच्यामते जर तुम्ही आवश्यक ते प्रयत्न करण्यास तयार असाल तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीतीही परिस्थिती रोखू शकत नाही.

UPSC क्रॅक करण्यासाठी या ट्रिक्स वापरल्या
UPSC परीक्षेचा अभ्यास कसा केला याविषयी पद्मिनी यांनी एका मुलाखतीदरम्यान त्यांनी वापरलेले तंत्र स्पष्ट केले. त्या सांगतात की जेव्हा त्यांनी UPSC ची तयारी सुरू केली तेव्हा त्यांची नियुक्ती (UPSC Success Story) पर्यटन मंत्रालयाने केली होती. या पदावर नोकरी करत असताना त्यांनी UPSC ची पहिली परीक्षा दिली तेव्हा अपयश आले. यानंतर त्यांनी अभ्यासाची रणनिती बदलली. परीक्षेचा अपेक्षित निकाल पदरी पाडून घेण्यासाठी त्यांनी चंग बांधला आणि प्रत्येक विषयासाठी फक्त एकाच पुस्तकातून तयारी करण्याचे ठरवले.

प्रवासादरम्यान वर्तमानपत्रे वाचली
आपली तयारी चांगली झाली आहे अशी खात्री पटल्यानंतर त्यांनी सरावासाठी मॉक टेस्ट देण्यास सुरुवात केली. पद्मिनी यांच्या मते, परीक्षेच्या तयारीसाठी उत्तर लिहिण्याचा सराव करणे खूप महत्त्वाचे आहे. अभ्यासक्रम (UPSC Success Story) पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रत्येक दिवसाचे वेळापत्रक केले होतेच शिवाय चालू घडामोडींविषयी अपडेट राहण्यासाठी त्या दररोज न चुकता वर्तमानपत्र वाचत असत. घर ते ऑफीस या प्रवासात जो वेळ मिळायचा त्या वेळेत त्या वर्तमानपत्रे वाचत असत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com