UPSC परीक्षेत मंगळवेढ्याचा हर्षल भोसले देशात पहिला

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

सोलापूर प्रतिनिधी | केंद्रीय लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या आयईएस म्हणजेच इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील तांडोर येथील हर्षल ज्ञानेश्वर भोसले याने देशात प्रथम क्रमांकाने येण्याचा मान पटकावला आहे. हर्षल याने पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळविले आहे. लोकसेवा आयोगाने शुक्रवार २५ ऑकटोम्बर रोजी संकेतस्थळावर निकाल जाहीर केला. ज्यामध्ये हर्षलने देशभरात प्रथम येऊन सोलापूरचा नावलौकिक केला.

२०१८ मध्ये लोकसेवा आयोगामार्फत जानेवारीत लेखी परीक्षा घेण्यात आली होती. सप्टेंबर आणि ऑकटोम्बर महिन्यात उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा मुलाखतीचा टप्पा पार पडला होता. या परीक्षेंतर्गत ५११ जागा रिक्त होत्या. त्यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकीच्या १६१,यंत्र अभियांत्रिकीच्या १३६, विद्युतच्या १०८, अणू विद्युत व दूरसंचार अभियांत्रिकी शाखेच्या १०६ जागा रिक्त होत्या.

पाच वर्षाचा असतानाच हर्षलच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. तर आईने शेती करून हर्षलचे शिक्षण पूर्ण केले. मंगळवेढा येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे हर्षलचे शालेय शिक्षण झाले. तर सोलापुरातील उत्तर सोलापूर तालुक्यातील देगाव येथील माध्यमिक आश्रमशाळेत नववी ते दहावी पर्यंतचे शिक्षण त्याने पूर्ण केले. बीड येथील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकल येथे डिप्लोमा तर कराड येथील गव्हर्नमेंट कॉलेज येथे डिग्रीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटर येथे एक महिन्याचे ट्रेनिंग घेऊन तिथला राजीनामा दिला. त्यानंतर ऑइल अँड नॅचरल गॅस कार्पोरेशन पुणे येथे हर्षलची निवड झाली. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या इंजिनिअर सर्व्हिसेसची प्रीलियम जानेवारी महिन्यात तर त्यानंतर मुख्य परीक्षा जून महिन्यात दिली. नंतर सप्टेंबर महिन्यात मुलाखती पार पडल्या. नुकताच यूपीएससीचा निकाल जाहीर झाला. ज्यामध्ये हर्षल भोसले यांने देशात प्रथम क्रमांक पटकावला.