मोठी बातमी! UGC कडून परीक्षेसाठी नवी नियमावली जारी; आता ‘अशी’ होणार परिक्षा

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र सरकारने अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यावर ठाम भूमिका घेतली असली तरी विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) परीक्षा घेण्यासाठीची कार्यपद्धती जाहीर केली आहे. त्यामुळे आता परीक्षा होणार असल्याचे नक्की झाले आहे. कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी तापमान मोजणे, सॅनिटायझर, मास्क आदींचा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याआधी राज्य सरकारने परीक्षा ऐच्छिक केल्या होत्या. ज्यांना परीक्षा द्यायच्या नाहीत त्यांना सरासरी गुणांवर प्रमाणपत्र दिले जाणार होते. मात्र आता ६ जुलैला केंद्रीय गृह मंत्रालयाने आणि यूजीसीने परीक्षा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

आता विद्यापीठांना प्रत्यक्ष लेखी अथवा ऑनलाईन अथवा मिश्र पद्धतीने परीक्षा घ्याव्या लागणार आहेत. यासाठी सप्टेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. युजीसी ने परीक्षा कशा घ्याव्यात यासंदर्भातील मार्गदर्शक सूची आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. या मार्गदर्शक सूचीमध्ये परीक्षा केंद्रातील भिंती, दरवाजे,  प्रवेशद्वारे,खुर्च्या निर्जंतुक करणे, प्रवेशद्वारावर सॅनिटायझर उपलब्ध करून देणे, कर्मचाऱ्यांना हातमोजे तसेच मास्क देणे, प्राध्यापक-कर्मचाऱ्यांकडून त्यांना कोणताही त्रास होणार नाही याचे हमीपत्र देणे, केंद्रात प्रवेश करताना विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी यांचे तापमान तपासणे, सर्वानी आरोग्य सेतू ऍप डाऊनलोड करणे, गर्दी टाळणे, दोन मीटर अंतर ठेवणारे चौकोन आखणे, वापरलेले मास्क, हातमोजे यांची सुरक्षित रित्या विल्हेवाट लावणे या नियमांचा समावेश आहे. 

परीक्षा देताना विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी दोघांमध्ये एक बाकडे रिकामे ठेवावे असे सांगण्यात आले आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र आणि कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र पास म्हणून वापरावेत अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. ताप, खोकला असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वेगळी व्यवस्था करावी अथवा त्यांना परीक्षेसाठी पुन्हा संधी द्यावी असे या नियमांमध्ये सांगण्यात आले आहे.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com