करिअरनामा ऑनलाईन । या ना त्या कारणामुळे (Talathi Bharti) तलाठी भरती परीक्षा नेहमीच वादात सापडली आहे. परीक्षा होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिकेमधील गोंधळामुळे ही परीक्षा चर्चेत होती. भरतीच्या निकालानंतर सामान्यीकरणाच्या (नॉर्मलायजेशन) नावाखाली अनेकांना अधिक गुण दिल्याने संतापाची लाट पसरली आहे. सामान्यीकरण ही प्रक्रियाच चुकीची असल्याबद्दल औरंगाबाद खंडपीठात यापूर्वीच परिचारिका भरतीच्या विद्यार्थ्यांनी आव्हान दिलेले आहे.
सामान्यीकरणाच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल
राज्यातील विविध संवर्गातील परीक्षा ‘टीसीएस’ या संस्थेमार्फत घेतली जात आहे. यापूर्वी ऑगस्ट २०२३ मध्ये वैद्यकीय शिक्षण व संशोधन (डीएमईआर) विभागांतर्गत परिचारिका पदासाठी (Talathi Bharti) घेतलेल्या परीक्षेची मूळ गुणवत्तेनुसार यादी जाहीर न करता विद्यार्थ्यांना सामान्यीकरणाच्या नावाखाली ३० ते ३५ अधिकेच गुण दिले.
त्यामुळे कमी गुण असलेले विद्यार्थी हे अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यांच्या पुढे निघून गेले. या विरोधात विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केलेली आहे. या याचिकेवर सध्या सुनावणी सुरू आहे.
भरती प्रक्रियेची सद्यस्थिती (Talathi Bharti)
राज्यभरात ही परीक्षा ८ ऑक्टोबर रोजी झाली होती. छाननीनंतर चार हजार ४६६ जागांसाठी दहा लाख ४१ हजार ७१३ अर्ज आले होते. त्यापैकी प्रत्यक्षात आठ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली होती. १७ ते २२ ऑगस्ट पहिला टप्पा, २६ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दुसरा टप्पा आणि ४ ते १४ सप्टेंबर अशी ही परीक्षा घेतली होती.
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यापैकी हिंगोली येथे परीक्षेचे केंद्र नव्हते, तर नांदेडला परीक्षाच झाली नाही. छत्रपती संभाजीनगरच्या १५४ जागांसाठी १६ हजार उमेदवारांनी परीक्षा दिली. जालना येथील १२२ जागांसाठी १७ हजार ८८६ उमेदवारांनी, परभणी येथे ९५ जागांसाठी २१ हजार ४३३ उमेदवारांनी परीक्षा दिली होती. बीड येथे १९० जागांसाठी ४८ हजार उमेदवारांनी तर लातूर येथील ५९ जागांसाठी ८०३७ उमेदवार परीक्षेला बसले होते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com