करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र शासनाच्या महसूल (Talathi Bharti 2023) विभागांतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण ४३४४ पदांवर भरती होणार आहे. या भरतीसाठी जमावबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे कार्यालय यांच्याकडून राज्यभरातील ३६ जिल्ह्यांमधील विविध केंद्रांवर ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे.
तलाठी पदाच्या ४३४४ जागांच्या भरतीसाठी संपूर्ण राज्यातून तब्बल १३ लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झालेले आहेत. या अगोदर तलाठीसाठी परीक्षा फक्त एका दिवशी होणार होती परंतु आता ही परीक्षा तब्बल १९ दिवस चालणार आहे. काही दिवसांपूर्वी या परीक्षेचे वेळापत्रकही प्रसिद्ध करण्यात आले आहे.
तलाठी भरती परीक्षेसाठी TCS कंपनीच्यावतीने तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. या भरतीसाठी आवश्यक असणारी ही परीक्षा १७ ऑगस्ट २०२३ ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत एकूण १९ दिवस होणार असून ही परीक्षा ३ सत्रांमध्ये घेतली जाणार आहे.
परीक्षेसंदर्भात महत्वाच्या तारखा –
1. १७ ऑगस्ट २०२३ ते २२ ऑगस्ट २०२३
2. २६ ऑगस्ट २०२३ ते २९ ऑगस्ट २०२३
3. ३१ ऑगस्ट २०२३ आणि १ सप्टेंबर २०२३
4. ४ सप्टेंबर २०२३ ते ६ सप्टेंबर २०२३
5. ८ सप्टेंबर २०२३ आणि १० सप्टेंबर २०२३
6. १३ सप्टेंबर २०२३ आणि १४ सप्टेंबर २०२३
वरील सर्व तारखांना सत्राची वेळ अशी असेल –
सत्र १ : सकाळी ९.०० ते ११.००
सत्र २ : दुपारी १२.३० ते २.३०
सत्र ३ : सायंकाळी ४.३० ते ६.३०
आज मिळणार हॉल तिकीट –
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण ४३४४ पदांच्या भरती परीक्षा आता तोंडावर आली आहे. TCS च्या वतीने या परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून, TCS आणि शासनाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या सूचनांनुसार परीक्षेचे प्रवेश पत्र (Talathi Bharti Hall-ticket) उमेदवारांना परीक्षेपूर्वी ३ दिवस अगोदर अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानुसार, तलाठी भरतीसाठी अर्ज करून पात्र ठरलेल्या उमेदवारांना आजपासून हॉलतिकीट (Talathi Bharti 2023) अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध होण्याची शक्यता आहे. हॉल तिकीट संदर्भातील माहिती उमेदवाराच्या मोबाईल, ईमेल आयडी वर पाठवली जाईल. सर्व उमेदवारांनी त्यांचे ई मेल युजर आयडी एकदा चेक करून पाहावे की तुम्ही दिलेला मेल आयडी आणि मोबाईल नंबर बरोबर आहे का याची खात्री करावी.
तलाठी पदभरतीबाबत अधिक माहितीसाठी, आणि तुमचे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी http://mahabhumi.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी.
असं आहे परीक्षेचे स्वरूप – (Talathi Bharti 2023)
1. तलाठी पद भरतीसाठी घेण्यात येणारी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल.
2. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी/ अंकगणित या विषयांसाठी प्रत्येकी ५० गुण, अशी एकूण २०० गुणांची परीक्षा उमेदवाराला ऑनलाइन पद्धतीने द्यावी लागणार आहे.
3. प्रत्येक विषयाच्या विभागात २५ प्रश्न असून, प्रत्येक प्रश्नाला प्रत्येकी २ गुण असतील.
4. सदर परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या समान असेल. परंतु, मराठी आणि इंग्रजी विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (बारावी) समान राहील.
5. निवडप्रक्रियेत पात्र होण्यासाठी उमेदवाराला किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे अनिवार्य असेल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com