करिअरनामा ऑनलाईन । राज्यात सुरु असलेल्या तलाठी (Talathi Bharti 2023) भरती परीक्षेत गैरप्रकार होत असल्याचे समोर येत असतानाच, परीक्षेच्या टीसीएस केंद्रातील कर्मचारीच परीक्षार्थींना कॉपी पुरवत असल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादमध्ये उघडकीस आला आहे. औरंगाबादच्या आय ऑन डिजीटल परीक्षा केंद्राबाहेरून एकजण कॉपी पुरवत असताना पोलिसांनी त्याला 5 सप्टेंबरला बेड्या ठोकल्या होत्या. राजू भीमराव नागरे (वय 29 वर्षे, रा. कातराबाद, औरंगाबाद) असे या आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे, नागरेला पोलिसांनी अटक करताच थेट मंत्रालयातून पोलिसांना फोनाफानी सुरु झाल्याने, या घोटाळ्याचे धागेदोरे थेट मंत्रालयापर्यंत असल्याची चर्चा आहे.
नेमकं प्रकरण काय?
या प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. 5 सप्टेंबरला पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांनी हर्मन कंपनीच्या समोरून जाणाऱ्या रोडवर काही संशयीत व्यक्ती आढळले होते. या प्रकरणात पोलिसांनी राजू भीमराव नागरे (वय 29, रा. कादराबाद) याला ताब्यात घेतले होते. या युवकाच्या जवळ मास्टर कार्ड, दोन मोबाइल आढळले होते. पोलिसांनी मोबाइल चेक केले असता, त्याच्या मोबाइलच्या टेलिग्रॅम अॅपवर पाच सप्टेंबरच्या तलाठी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेमधील ३४ प्रश्नांचे फोटो आढळून आले. यानंतर पोलिसांनी विचारणा केली असता, त्याच्यासोबत विजय पाटील, आणि अन्य दोन जण असल्याचे त्यांनी सांगितले होते. याशिवाय परीक्षेत बसलेल्या एका परीक्षार्थीचीही माहिती दिली होती. या आधारे पेालिसांनी परिक्षेस बसलेल्या परिक्षार्थीची विचारपूस केली. त्यांच्याजवळून मोबाईल जप्त करण्यात आले होते. या प्रकरणात राजु भिमराव नागरे, विजय पाटील, परिक्षार्थी व दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात एमआयडीसी सिडको पेालिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाचा तपास करीत असताना तलाठी परीक्षा केंद्रावर (Talathi Bharti 2023) असलेल्या काही कर्मचाऱ्यांचाही यामध्ये सहभाग असल्याने त्यांचा तपास सुरु आहे. याशिवाय राजू नागरे याच्या मोबाइलमध्ये एक ‘पोलिस बाबा’ या नावाने नंबर सेव्ह आहे. या ‘पोलिस बाबा’चा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. पोलिस बाबाचा या तलाठी परीक्षेत सहभाग आहे का, याचा शोध घेण्यात येत आहे.
नागरेसाठी थेट मंत्रालयातून फोन (Talathi Bharti 2023)
मागील काही दिवसांत वेगवेगळ्या भरती परीक्षेत होणारे गैरप्रकार वाढले आहेत. या प्रकरणी अनेक गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. थेट परीक्षा केंद्रातील कर्मचारीच या सर्व घोटाळ्यात सहभागी होत असल्याने खळबळ उडाली आहे. तर या सर्व प्रकरणात मोठे रॅकेट असल्याचा आरोप होत असतानाच, आता मंत्रालय कनेक्शन देखील समोर येत आहे. औरंगाबाद पोलिसांनी कॉपी पुरवणाऱ्या नागरेला ताब्यात घेतल्यावर त्यासाठी थेट मंत्रालयातून पोलिसांना फोन येत आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाचे कनेक्शन थेट मंत्रालयापर्यंत असल्याची चर्चा आहे.
कॉपी पुरवण्याचा दर 3 लाख रुपये
परीक्षा केंद्रावर गेल्या काही परीक्षांमध्ये उमेदवारांकडे मोबाइल, इअरफोन, मख्खी फोन असे साहित्य आढळल्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. परीक्षा केंद्रात उत्तरे (Talathi Bharti 2023) परीक्षार्थीपर्यंत पोहोचविण्यासाठी तीन लाख रुपये काही कर्मचाऱ्यांनी घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिस या माहितीचाही तपास करीत आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com