करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र शासनाच्या (Talathi Bharti 2023) महसूल व वन विभागाने, महसूल विभागांतर्गत तलाठी पदभरतीची घोषणा केली आहे त्यानुसार राज्यभर या पदभरतीसाठी दि. १७ ऑगस्टपासून परीक्षेला सुरुवात झाली आहे. या परीक्षेला सुरुवात झाल्यापासूनच या ना त्या कारणावरून परीक्षेदरम्यान गोंधळ निर्माण झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.
तलाठी भरती परीक्षेमधील विविध गोंधळामुळे ही परीक्षा चर्चेत आहे. परीक्षेतील सततच्या गैरप्रकारांमुळे परीक्षा स्थगितीची मागणी केली जात असतानाच मुंबईतील एका परीक्षा केंद्रावर गोंधळाचा नवा प्रकार पाहायला मिळाला. आज दि. २८ ऑगस्ट २०२३ ला मुंबईतील, पवई आयटी पार्कच्या परीक्षा केंद्रावर परीक्षार्थी उमेदवार केंद्रावर पोहोचण्यापूर्वीच केंद्राचे मुख्य प्रवेशद्वार बंद केल्यामुळे उमेदवारांमध्ये गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले.
मुंबईतील, पवई आयटी पार्क परीक्षा केंद्रावर उमेदवारांना सकाळी ८ वाजता हजर राहण्यास सांगण्यात आले होते. ९.०० वाजता या परीक्षेच्या सत्र १ मधील पेपरला सुरुवात होणार होती. त्यामुळे, परीक्षेपूर्वी आणि दिलेल्या वेळेनुसार उमेदवार परीक्षा केंद्रावर पोहोचले. मात्र दिलेल्या वेळेपूर्वीच परीक्षा (Talathi Bharti 2023) केंद्राचे मुख्य प्रवेशद्वार बंद करून, या परीक्षा केंद्रावर काही उमेदवारांना प्रवेश नाकरण्यात आल्याने या उमेदवारांची परीक्षा केंद्राबाहेर गर्दी पाहाला मिळाली. त्याचबरोबर परीक्षा केंद्रावर उमेदवारांशी संवाद साधायला एकही परीक्षा केंद्र अधिकारी उपस्थित नसल्यामुळे येथे उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये संताप पहायला मिळाला.
“आम्हाला दिलेल्या माहितीनुसार आणि नियमांप्रमाणे आम्ही वेळेपूर्वीच परीक्षा केंद्रावर पोहोचलो होतो. मात्र, दिलेल्या वेळेपूर्वीच या परीक्षा केंद्राचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले. शिवाय, घडल्या प्रकाराबद्दल आम्हाला कोणतीही माहिती किंवा कारण देण्यासाठी परीक्षा केंद्रावर कोणताही केंद्र अधिकारी उपस्थित नव्हता. त्यामुळे, याप्रकरणाचा जाब कोणाला विचारणार…?”, असा संतप्त सवाल परिक्षार्थी उमेदवारांनी केला आहे.
दरम्यान परीक्षा केंद्रावर उमेदवारांशी संवाद साधण्यासाठी कोणीही हजर नसल्यामुळे पोलिसांनी मध्यस्थी करत संतप्त विद्यार्थ्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. मात्र, परीक्षेदरम्यान (Talathi Bharti 2023) घडणार्या गोंधळाचा त्रास आम्ही किती काळ सहन करायचा आणि आमच्या होणार्या नुकसनाची जबाबदारी कोण घेणार? हा प्रश्नही या उमेदवारांकडून केला जात आहे.
जमावबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे कार्यालय यांच्याकडून राज्यभरातील ३६ जिल्ह्यांमधील विविध केंद्रांवर ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. तलाठी भरती परीक्षेसाठी TCS कंपनीच्यावतीने तारखा निश्चित करण्यात आल्या. परीक्षेच्या नियोजित वेळापत्रकानुसार दिवसाला तीन सत्रामध्ये ही परीक्षा पार पडते. मात्र, आज पहिल्या सत्रामध्येच हा प्रकार घडल्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com