करियरनामा ऑनलाईन। स्पर्धा परीक्षातून उत्तीर्ण होणे वाटते तितकं सोपं काम नाही. अनेकांचे आयुष्य निघून जातात पण यश काही हाताला लागत नाही. पण अनेकजण आपल्या मेहनतीच्या जोरावर यश खेचून आणतातच. (Success Story)बिहारचे 23 वर्षीय प्रदीप सिंह त्यापैकीच एक. चला तर मग आज प्रदीप सिंह यांचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेवूयात.
मुलाच्या स्वप्नासाठी घर विकलं! (Success Story)
बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यातील एक तरुण, वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून आयएएस अधिकारी बनतो. परंतु त्यांचा हा यशस्वी प्रवास अत्यंत खडतर होता. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूपच हलाखीची होती. त्यांचे वडील, मनोज सिंह, पेट्रोल पंपावर काम करायचे. मुलाच्या शिक्षणासाठी त्यांनी आपल्या आयुष्यभराची सगळी कमाई विकून टाकली.
प्रदीपचं शिक्षण सुरुवातीपासून इंदूरमध्ये झालं. लहानपणापासूनच हुशार असलेल्या प्रदीपने बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर यूपीएससीची तयारी करण्यासाठी दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला. दिल्लीत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी पोषक वातावरण होतं. त्यावेळी घरातील परिस्थितीमुळे दिल्लीतील कोचिंगसाठी लागणाऱ्या खर्चासाठी पैशाची जमवाजमव करणे सोपं नव्हतं. मात्र, मुलाच्या स्वप्नांसाठी वडिलांनी मोठं पाऊल उचललं आणि आपल्या मुलाच्या कलेक्टर बनण्याच्या स्वप्नासाठी स्वतःच राहत घर देखील विकलं. (Success Story)
परिस्थिती हालाखीची होती. त्यामुळे जास्त वर्ष प्रयत्न करत राहणं परवडणारं नव्हते. म्हणून पहिल्याच प्रयत्नात पोस्ट काढण्यासाठी प्रदीप मेहनत घेऊ लागले. दिवसाचे 20 तास अभ्यासात गढून जाऊ लागले. प्रदीपने 2018 मध्ये यूपीएससीचा पहिला प्रयत्न केला. संपूर्ण भारतात 93 वा रँक घेऊन पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश मिळवलं, मात्र त्यांना आयएएसऐवजी भारतीय महसूल सेवेत (IRS) नियुक्ती मिळाली. हे यश असूनही प्रदीपच्या मनात आयएएस अधिकारी होण्याचं स्वप्न मात्र अपूर्णच राहिलं. (Success Story)
दुसऱ्या प्रयत्नात थेट कलेक्टर
आयएएस होण्याच्या इच्छेपोटी प्रदीप यांनी तयारीत कोणतीच कसर ठेवली नाही. त्यांनी पुन्हा मेहनत घेतली आणि 2019 च्या यूपीएससी परीक्षेत संपूर्ण भारतात 26 वा क्रमांक मिळवला. या कामगिरीने त्यांच्या आयएएस होण्याचं स्वप्न पूर्ण झालं.
प्रदीप सांगतात की, त्यांच्या वडिलांनी घर विकून केलेल्या त्यागामुळे त्यांच्यावर प्रचंड दबाव होता. मात्र, त्यांनी मानसिक ताण न घेता अभ्यास करण्यावर भर दिला आणि कठोर मेहनत घेतली. त्याचेच फळ म्हणून वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी भारतातील सर्वात कठीण समवली जाणारी यूपीएससी परीक्षा (UPSC) ते उत्तीर्ण झाले.
प्रदीप यांच्या मते, यूपीएससीसाठी ठराविक रणनिती आखणं आणि त्यानुसार अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. सतत अभ्यास आणि अपयश पचवण्याची तयारी ठेवली पाहिजे. कठोर मेहनत घेतल्यावर कोणत्याही कठीण परीक्षेत यश मिळवता येतं. मात्र यासोबतच परीक्षेची काठिण्यपातळी लक्षात घेता आणि उत्तीर्ण होण्याची टक्केवारी पाहता प्लॅन बी सुद्धा तयार ठेवायला पाहिजे.
प्रदीप सिंह यांची ही कथा संघर्ष आणि जिद्दीची मूर्तिमंत उदाहरण आहे. त्यांचे कुटुंब, विशेषतः त्यांच्या वडिलांचा त्याग, आणि प्रदीपची चिकाटी यामुळे त्यांनी केवळ यश मिळवलं नाही, तर इतर अनेकांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला.
अशाच करिअर विषयक महत्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.
हे पण वाचा – IAF Agniveer Vayu Recruitment 2025: भारतीय हवाई दलात अग्निवीरवायू पदासाठी भरती जारी; 12वी पास उमेदवारांना मोठी संधी