Success Story : शाब्बास पोरी!! शेतात टॉर्च लावून केला अभ्यास; बोर्डाच्या परीक्षेत मिळवले भरघोस मार्क

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । आजच्या मोबाईलवेड्या युगात शाळकरी (Success Story) मुलांचं मोबाईल हातात घेतल्याशिवाय पान हलत नाही. मोबाईलच्या अती हव्यासापोटी मुलांनी आपल्या हाताने शारीरिक आणि मानसिक नुकसान करून घेतले आहे. पालकांनी कितीही दरडावलं तरी ही मुले मोबाईलची संगत सोडत नाहीत. स्मार्ट फोन आणि सोशल मिडियाचा विळखा मुलांभोवती घट्ट आवळला गेला आहे. पण या सर्वाला अपवाद ठरत आहे मोनिका. घरची बेताची आर्थिक परिस्थिती, आपुऱ्या सोयी सुविधा असूनही दुर्दम्य इच्छा शक्तीच्या बळावर यश मिळवून एका शेतकऱ्याच्या पोरीने स्वत:ला सिद्ध करून दाखवले आहे. मोबाईलपासून चार हात लांब राहून, शेतात टॉर्चच्या प्रकाशात अभ्यास करुन या मुलीने आता जिल्ह्यात टॉपर होण्याचा मान मिळवला आहे. आज जाणून घेऊयात सर्वांनाच प्रेरित करणारी तिची यशाची कहाणी.

बोर्डाच्या परीक्षेत मिळवले 95.50 टक्के
मोनिका असे या मुलीचे नाव आहे. तिने दहावीच्या (Success Story) बोर्डाच्या परिक्षेत तब्बल 95.50 टक्के गुण मिळवले आहेत. मोनिका ही राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील पचार गावातील रहिवासी आहे. नुकताच राजस्थान माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या बोर्डाच्या परिक्षेचा निकाल लागला. या परिक्षेत मोनिकाने हे घवघवीत असे यश मिळवले आहे.

मोबाईल आणि सोशल मिडिया पासून लांबच (Success Story)
मोनिका ही राजस्थानच्या विकास बाल भारत उच्च माध्यमिक शाळेत शिकली. तिने हे यश कसं मिळवलं याबाबत ती सांगते; “मी हे यश मिळवण्यासाठी पूर्ण वर्षभर 6 ते 7 तास अभ्यास केला. अभ्यासादरम्यान, कधीही मी मोबाईल फोनचा वापर केला नाही. तसेच कोणत्याही वेबसाईट किंवा ऑनलाईन क्लासचा वापर केला नाही. मी केवळ सेल्फ स्टडी करून हे यश मिळवले आहे.” मोनिकाने नेहमीच शाळेत शिकवलेल्या टॉपिक्सची पुन्हा पुन्हा उजळणी करण्यावर भर दिला यामुळे तिला हिंदीत 100, इंग्रजीत 69, विज्ञानात 96, सोशल सायन्समध्ये 90, गणितात 94 आणि संस्कृतमध्ये 97 गुण मिळाले आहेत.

शेतात राहून टॉर्चच्या प्रकाशात केला अभ्यास
मोनिकाचे आई-वडील शेती करतात. दररोज आपला अभ्यास (Success Story) झाल्यावर ती आपल्या कुटुंबीयांना शेतीच्या कामात मदत करायची. नंतर शेतात थांबून बॅटरी, लॅम्प किंवा टॉर्चच्या उजेडात ती परीक्षेचा अभ्यास करायची. मोनिकाची आई सांगते; “मोनिकाला डॉक्टर बनून करिअर करायचे आहे. ती अकरावीच्या वर्गात बायोलॉजीला प्रवेश घेणार असून पुढे जाऊन NEET परीक्षेची तयारी करणार आहे.”
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com