Success Story : पदक हुकल्यानंतर देश सोडून जाणाऱ्या मनूने पॅरिसमध्ये इतिहास रचला; जाणून घ्या तिच्या संपूर्ण प्रवासाविषयी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । भारताची प्रख्यात पिस्तुल नेमबाज (Success Story) मनू भाकर हिने 2024 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत देशाला पहिले पदक जिंकून देवून इतिहास रचला आहे. या उल्लेखनीय कामगिरीपर्यंतचा तिचा प्रवास तितका सोपा राहिला नाही. 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये निराशाजनक कामगिरीनंतर, जिथे तिला तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला आणि अपेक्षा पूर्ण करण्यात अयशस्वी झाली; तिथे मनूने तिचा खेळ पूर्णपणे सोडून देण्याचा विचार केला होता.

मनूचे (Manu Bhaker) वडील सांगतात की टोकियोमध्ये आलेल्या अपयशानंतर मनू खूप निराश होती आणि तिने तिच्या करिअरचा मार्ग बदलण्याचा विचार केला. एका क्षणी, शूटिंग सोडून परदेशात पुढील शिक्षण घेण्याची किंवा सर्व्हिसेसमध्ये करिअर करण्याकडे ती आकर्षित झाली.

मनूच्या कारकिर्दीतील टर्निंग पॉइंट (Success Story)
2023 मध्ये मनूची शूटिंगची आवड पुन्हा जागृत करणारा एक क्षण परत आला तो तिचे बालपणीचे प्रशिक्षक जसपाल राणा यांच्या सल्ल्यामुळे. राणा यांच्या शब्दांचा तिच्यावर कसा खोल परिणाम झाला हे मनूने सांगितले. एका महत्त्वपूर्ण संभाषणादरम्यान राणा यांनी तिला तिच्या भविष्यातील योजनांबद्दल विचारले. मनूने तिची अनिश्चितता आणि शूटिंग सोडण्याचे तिचे विचार व्यक्त केले. प्रत्युत्तरात राणा तिला म्हणाला, “तू फक्त देशातीलच नाही तर जगातील सर्वोत्तम नेमबाजांपैकी एक आहेस. तुला तुझ्या आयुष्यात काय करायचं आहे हे तुझ्यावर अवलंबून आहे.” हे प्रोत्साहन मनूसाठी एक टर्निंग पॉईंट बनले आणि तिला तिच्या खेळासाठी पूर्णपणे वचनबद्ध होण्यास प्रेरित केले.

नेमबाजीत 12 वर्षानंतर मिळाले पदक
रविवारी, मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत कांस्यपदक मिळवून तिचे स्वप्न साकार केले. तिचा हा विजय विशेष महत्त्वाचा आहे कारण ही कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला आहे. हे पदक केवळ तिच्या अपवादात्मक कौशल्यावर प्रकाश टाकत नाही तर ऑलिम्पिक (Success Story) नेमबाजी पदकासाठी 12 वर्षांची प्रतीक्षा संपवून भारतीय नेमबाजीसाठी एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड देखील ठरली आहे. तिच्या या विजयामुळे तिला राज्यवर्धन सिंग राठोड, अभिनव बिंद्रा, विजय कुमार आणि गगन नारंग यांसारख्या प्रसिद्ध भारतीय नेमबाजांच्या बरोबरीने स्थान मिळाले आहे; ज्यांनी यापूर्वी भारतासाठी ऑलिम्पिक पदके जिंकली आहेत.

मनु भाकरचा शैक्षणिक प्रवास
खेळासह मनू भाकरने शैक्षणिक क्षेत्रातही उत्तम कामगिरी केली आहे. तिने 2021 मध्ये दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्री राम कॉलेजमधून राज्यशास्त्र विषयात ऑनर्स पदवी मिळवली. सध्या ती पंजाब विद्यापीठात सार्वजनिक प्रशासनात पदवी घेत आहे, तिने तिच्या शैक्षणिक आणि ऍथलेटिक कारकिर्दीत संतुलन राखले आहे.

आईला वाटत होतं मुलीने डॉक्टर व्हावं (Success Story)
मनूची आई डॉ. सुमेधा भाकर या शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या. आपल्या मुलीने डॉक्टर व्हावे अशी त्यांची इच्छा होती. शाळेच्या शारीरिक शिक्षकाने मनूला खेळाकडे लक्ष द्यायला सांगितले. तिचे शिक्षक तिच्या आईला म्हणायचे; मनू डॉक्टर झाली तर तिला कोण ओळखेळ? मनूने जर देशासाठी पदक जिंकले तर सारे जग तिला ओळखेल. डॉक्टर सुमेधा यांना शारीरिक शिक्षकांचा सल्ला योग्य वाटला आणि इथूनच मनूचा क्रीडा प्रवास सुरू झाला.

डोळ्याच्या दुखापतीनंतर बॉक्सिंग सोडले
मनूचे वडील राम किशन यांची इच्छा होती की मुलीने बॉक्सर व्हावे; कारण मनूचा मोठा भाऊ बॉक्सिंग खेळायचा. मनूनेही बॉक्सिंगला सुरुवात केली. तसेच राष्ट्रीय स्तरावर पदके जिंकली. एके दिवशी सराव करताना मनूच्या डोळ्याला दुखापत झाली. डोळा चांगलाच सुजला. या दुखापतीनंतर मनूने बॉक्सिंग सोडण्याचा निर्णय घेतला. यामध्ये तिला आईचीही पूर्ण साथ मिळाली. आईने मनूच्या वडिलांना स्पष्टपणे सांगितले की ती मनूला असा खेळ खेळू देणार नाही ज्यात तिची मुलगी जखमी होईल.
त्यानंतर मनूने बॉक्सिंग सोडून मार्शल आर्टमध्ये हात आजमावला. इथे मनूला वाटले की या खेळात फसवणूक होते. तिने मार्शल आर्ट्सही सोडून दिले. तिरंदाजी, टेनिस, स्केटिंगचा सराव सुरू केला, पदकेही जिंकली, पण यामध्ये तिला जास्त रस वाटला नाही.

प्रशिक्षक म्हणाले; “ही मुलगी पदक आणेल”
मनूने अनेक खेळांमध्ये हात आजमावला, पण तिला (Success Story) काहीच समजत नव्हते. ज्या युनिव्हर्सल स्कूलमध्ये तिची आई मुख्याध्यापिका होती तिथेही शूटिंग रेंज आहे. आईने मनूला वडिलांसोबत शूटिंग रेंजवर पाठवले. मनूने पहिला शॉट मारताच शारीरिक शिक्षक अनिल जाखड यांनी तिची प्रतिभा ओळखली. त्यांनी मनूच्या आईला सांगितले की; “मनूला या खेळासाठी वेळ देऊ द्या, ती देशासाठी पदके आणेल.”

वडिलांनी पिस्तूल दिली
तेव्हा मनू फक्त 14 वर्षांची होती. त्यावेळी रिओ ऑलिम्पिक-2016 नुकतेच संपले होते. मनूने वडिलांना आठवड्याभरात शूटिंग पिस्तूल आणायला सांगितले. वडिलांनी मुलीची विनंती मान्य करत तिला पिस्तूल दिले. फक्त एक वर्षानंतर, मनूने राष्ट्रीय स्तरावर पदक जिंकले आणि शूटिंग फेडरेशनच्या कनिष्ठ कार्यक्रमासाठी निवड झाली. तेथे तिला आंतरराष्ट्रीय पदक विजेता जसपाल राणा यांची साथ मिळाली. जसपाल राणा सध्या मनूचे प्रशिक्षक आहेत.

15 दिवसांच्या सरावात सुवर्णपदक पटकावले
मनूने केवळ 15 दिवस सराव केला आणि महेंद्रगड येथे झालेल्या राज्य स्पर्धेत भाग घेण्यासाठी ती गेली.तिने पहिल्याच स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून पुनरागमन केले. तिला यावेळी 4500 रुपयाचे बक्षीस मिळाले. मनूला खूप आनंद झाला. ती नेमबाजीत चांगली कामगिरी करू शकते, असे तिच्या (Success Story) पालकांनाही वाटू लागले.
नेमबाजी सुरू केल्यानंतर अवघ्या तीन वर्षांनी मनूने 2017 मध्ये राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत प्रवेश केला. तिने ऑलिम्पियन आणि माजी जागतिक नंबर-1 हीना सिद्धूचा पराभव केला. तसेच 10 मीटर एअर पिस्तुलमध्ये 242.3 गुण मिळवून नवा विक्रम रचला. मनूने चॅम्पियनशिपमध्ये 9 सुवर्ण पदके जिंकली. हा तिचा राष्ट्रीय विक्रम आहे.

आईने मुलीच्या सरावासाठी नोकरी सोडली
मनूची आई डॉ. सुमेधा सांगतात, ‘जेव्हा मनूने 2018 मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले तेव्हा मला वाटले की आता माझ्या मुलीला माझी गरज आहे. यासाठी मी माझी शाळेची नोकरी सोडली. त्या मनूला नियमित सरावासाठी दिल्लीतील डॉ. करणी सिंग शूटिंग रेंजमध्ये घेऊन जाऊ लागल्या.

मनूचं पिस्तूल कपाटात ठेवलं
टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक न जिंकल्याचा परिणाम मनूच्या नेमबाजीवर दिसून आला. एक वेळ अशी आली जेव्हा तिला राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. आई डॉ. सुमेधा सांगतात, “मनू खूप उदास होती. तिला परदेशात जाऊन फॅशन डिझायनिंग आणि मार्केटिंग मॅनेजमेंटचा कोर्स करायचा आहे. मी ही या निर्णयाला होकार दिला आणि मनूचं पिस्तूल कपाटात ठेवलं. मनूला शूटिंगची खूप आवड आहे. ती यापासून फार काळ लांब राहू शकली नसती हे मला माहीत होतं. ती पुन्हा सराव करु लागली. मनूचा हा निर्णय योग्य ठरला. तिचे प्रशिक्षक जसपाल राणा पुन्हा तिच्यासाठी रुजू झाले.

स्पर्धेदरम्यान पिस्तूलमध्ये बिघाड (Success Story)
टोकियो ऑलिम्पिकमध्ये पिस्तूल खराब झाल्यामुळे मनू 12व्या स्थानावर राहिली. जेव्हा मनूला या वाईट अनुभवाबद्दल विचारण्यात आले तेव्हा मनूने सांगितले की; “मी ही बदलू शकत नाही. त्यावेळीही घडू शकणाऱ्या सर्वोत्तम गोष्टींचा मी प्रयत्न केला. भूतकाळ भूतकाळात सोडला तर बरे होईल; असे मला वाटते.”

मुलगी मेडल जिंकत होती, दुसरीकडे लायसन्ससाठी पायपीट सुरू होती
मनूचे वडील रामकिशन भाकर सांगतात, ‘सुरुवातीला पिस्तुलचा परवाना मिळवण्यासाठी खूप फेऱ्या माराव्या लागल्या. मनू आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके जिंकत होती, तरीही परवाना नूतनीकरण करण्यासाठी मला पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयात फेऱ्या माराव्या लागल्या. आता नेमबाजांचे परवाने बनवण्याची प्रक्रिया खूपच सोपी झाली आहे.
2018 मध्ये, मनूने आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघ म्हणजेच ISSF मध्ये दोन सुवर्ण जिंकले. चॅम्पियनशिपमध्ये ज्या पिस्तुलाने गोळी झाडली त्याचा परवाना मिळविण्यासाठी मनूला अडीच महिने लागले. साधारणपणे खेळाडूंना हा परवाना आठवडाभरात मिळतो.

पॅरिसमध्ये एकतरी सुवर्ण जिंकायचंच आहे
यावेळी भारताचे 21 नेमबाज ऑलिम्पिकसाठी (Success Story) पात्र ठरले आहेत. त्यापैकी मनू ही एकमेव नेमबाज आहे, जी तीन स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहे. यामध्ये 10 मीटर एअर पिस्तूल, 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र आणि 25 मीटर पिस्तुल इव्हेंटचा समावेश आहे. टोकियो ऑलिम्पिकच्या वाईट आठवणी सोडून मनू आता पॅरिसमध्ये सुवर्ण पदक जिंकण्याच्या तयारीत आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com