करिअरनामा ऑनलाईन । महाविद्यालयीन शिक्षण घेत (Success Story) असताना अनेक तरुण तरुणींना चिंता सतावत असते ती म्हणजे नोकरीची. वाढत्या स्पर्धेच्या युगात मनासारखी नोकरी मिळण्याची शाश्वती देता येणं तसं कठीणच. अशा परिस्थितीत काही तरुण नोकरीच्या मागे धावत असतात तर काही तरुण व्यवसाय करण्याचा मार्ग निवडतात.
नोकरी मिळाली नाही तर अनेकजण हताश होताना दिसतात. पण असे अनेक तरुण आहेत जे नोकरीची चिंता न करता व्यवसाय सुरु करून महिन्याला लाखो रुपये कमवतात. अशीच एक तरुणी आहे जीने नोकरीच्या मागे न धावता वेगळी वाट शोधून तरुणांसमोर आदर्श ठेवला आहे. गुरलीन चावला असं या तरुणीचं नांव आहे; ती मुळची झाशीची रहिवासी आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर गुरलीनने काहीतरी वेगळे करण्याचा विचार केला. तिने ओसाड जमिनीवर स्ट्रॉबेरीचे उत्पन्न घेण्यास सुरुवात केली. तिने तिची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत केली. आज गुरलीन दर महिन्याला लाखो रुपये कमावते. पण तिचा हा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता. गुरलीन जिथे राहते तिथे वातावरण खूप उष्ण असते. अशा वातावरणात स्ट्रॉबेरीची लागवड करुन तिने सर्वांनाच चकित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गुरलीनचे कौतुक केले आहे. मेहनत घेतली आणि झोकून देवून काम केलं की प्रत्येक क्षेत्रात यश मिळवता येतं हे गुरलीनने दाखवून दिलं आहे.
नेमकी कशी झाली सुरुवात (Success Story)
गुरलीनने कायद्याची पदवी घेतली आहे. कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे तिला नाईलाजास्तव झाशीला यावे लागले. लॉकडाऊनमधील मोकळ्या वेळेचा तिने पुरेपूर फायदा घेतला. तिला मुळातच स्ट्रॉबेरी खायला फार आवडायचं. या छंदापोटी सुरुवातीला तिने स्ट्रॉबेरीची काही झाडे तिच्या घराच्या कुंडीत लावली. या रोपाचे चांगले परिणाम मिळाल्यानंतर तिने तिच्या वडिलांच्या फार्म हाऊसवर सुमारे दीड एकर जमिनीवर स्ट्रॉबेरीची लागवड सुरू केली. गुरलीनला स्ट्रॉबेरीची शेती करताना पाहून इतर शेतकरीही तिच्याकडे आकर्षित झाले.
सोशल मिडियाच्या माध्यमातून शेती करायला शिकली
गुरलीनने सांगितल्याप्रमाणे तिने अनेक व्हिडिओ पहिले आणि या माध्यमातून ती स्ट्रॉबेरीची शेती करायला शिकली होती. गुरलीनची मेहनत पाहून तिच्या वडिलांनीही तिला साथ दिली. त्यांनी चार एकर जमिनीवर कोणतेही पीक घेतले नाही. ऑक्टोबर महिन्यात तिने बाजारातून 20 हजार स्ट्रॉबेरीची रोपे खरेदी करून दीड एकर जमिनीवर लावली. डिसेंबरमध्ये हे उत्पादन विक्रीसाठी तयार झाले. गुरलीनने फळांसाठी स्थानिक बाजारपेठ गाठली, बघता बघता तिची सर्व फळे विकली गेली.
वेबसाईटच्या माध्यमातून मिळतात ऑर्डर
गुरलीनच्या म्हणण्यानुसार, तिने ‘झाशी ऑरगॅनिक्स’ नावाची वेबसाईटही (Success Story) डिझाईन केली होती. या माध्यमातून लोक ऑनलाईन पद्धतीने स्ट्रॉबेरी ऑर्डर करु शकतात. गुरलीन स्ट्रॉबेरीसोबत भाजीपालाही पिकवत आहे. ती सध्या सात एकर जमिनीवर शेती करत आहे. तिच्या शेतात दररोज 70 किलो स्ट्रॉबेरीचे उत्पादन होते तर यामाध्यमातून दररोज सुमारे 30 हजार रुपयांची विक्रीही होते.
पीएम मोदींनीही केलं कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या ‘मन की बात’मध्ये गुरलीन चावला आणि तिच्या स्ट्रॉबेरी शेती उपक्रमाचा उल्लेख केला आहे. झाशीमध्ये स्ट्रॉबेरीची यशस्वी लागवड आणि उत्पन्न घेतल्यानंतर तिच्यावर प्रशासन आणि सरकारकडून कौतुकाचा वर्षाव झाला आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com