करिअरनामा ऑनलाईन । उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधील (Success Story) संगम नगरच्या तरुणाने नाव मोठे केले आहे. या तरुणाचा संघर्ष पाहिल्यानंतर सर्वांनाच प्रेरणा मिळेल. वास्तविक, प्रयागराज येथे राहणारा अहाद अहमद काही वर्षांपूर्वीपर्यंत वडिलांसोबत सायकलचे पंक्चर काढत असे. पण आता हा तरुण थेट न्यायाधीशाच्या खुर्चीवर बसणार आहे.
विना कोचिंग फक्त सेल्फ स्टडी
काही वर्षांपूर्वी अहाद त्याच्या वडिलांसोबत सायकल दुरुस्त करायचा. पण आता तो थेट न्यायाधीशांच्या खुर्चीवर बसणार आहे. काही दिवसापूर्वी उत्तर प्रदेशमध्ये PCS J म्हणजेच न्यायदंडाधिकारी पदाच्या भरतीचा निकाल जाहीर झाला. या यादीत अहाद अहमदचेही नाव होते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की अहादला पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळाले. त्याचा स्वतःच्या अभ्यासावर इतका विश्वास होता की त्याने या परीक्षेसाठी कोणतेही कोचिंग क्लास लावले नाहीत. त्याने केवळ सेल्फ स्टडी करून परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
कुटुंबात आनंदी आनंद (Success Story)
अहादच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच. त्याच्या वडिलांचे टायरचे पंक्चर काढणाचे छोटे दुकान आहे. अशा बिकट आर्थिक परिस्थितीतही अहादने शिकण्याची जिद्द सोडली नाही. त्याला आयुष्यात खूप मोठं पद मिळवायचं होतं. त्यामुळे तो वडिलांना कामात मदत करत स्वतः शिकत राहिला. कोचिंग क्लासची फी परवडणारी नव्हती. त्यामुळे न्यायाधीश होण्यासाठी अभ्यास करताना त्याने केवळ सेल्फ स्टडीवर भर दिला आणि तो ही परीक्षा उत्तीर्ण झाला. मुलाच्या या मोठ्या यशामुळे संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. त्याच्या आनंदात प्रयागराजचे लोकही सहभागी होत आहेत. आहादचे हे यश खूप मोठे आहे कारण सायकलचे पंक्चर काढणाऱ्या माणसाने आपल्या मुलाला मोठ्या कष्टाने शिक्षण देऊन या स्तरावर नेले आहे; ही बाब कौतुकास्पद आहे.
आईने बजावली महत्त्वाची भूमिका
अहाद आज न्यायाधीश झाला असेल तर त्यामागे त्याच्या आईची भूमिका खूप महत्त्वाची आहे. आपल्या मुलाला शिकविण्याचे तिचे स्वप्न केवळ एका व्यक्तीच्या उत्पन्नातून पूर्ण (Success Story) होणार नाही हे तिला माहीत होते. त्यामुळे त्यांनी कपडे शिवण्याची कामे घेतली. यामधून मिळणाऱ्या कमाईतून त्या घर खर्चाबरोबर मुलाच्या शिक्षणासाठी हातभार लावत असत.
मला आई-वडिलांचा अभिमान
“माझ्या आई-वडिलांनी मला नेहमीच प्रामाणिकपणे काम करायला शिकवले आहे. आयुष्यात आलेल्या अनेक अडचणींचा सामना करुन माझ्या आई-वडिलांनी मला शिकवले आहे. मी एका पंक्चर काढणाऱ्या दुकानदाराचा मुलगा आहे, हे सांगताना मला कधीही कमीपणा वाटणार नाही. मला माझ्या आई- वडिलांचा अभिमान आहे. माझ्यासाठी त्यांनी दिलेले योगदान मी आयुष्यभर विसरणार नाही.” अशा शब्दात अहादने भावना व्यक्त केल्या.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com