करिअरनामा ऑनलाईन । शिवाजी विद्यापीठाची (Shivaji University) पदवी, पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्राची पडताळणी करण्याची प्रक्रिया आता अधिक सोपी होणार आहे. यासाठी प्रमाणपत्रावर क्यूआर कोड (QR Code) देऊन त्याद्वारे पडताळणी करण्याची नवी सुविधा विद्यापीठ उपलब्ध करुन देणार आहे.
क्यूआर कोड असलेली प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांना मिळणार
नोकरी तसेच उच्च शिक्षणासाठी पदवीची पडताळणी केली जाते. पुढील वर्षीच्या दीक्षान्त समारंभापासून क्यूआर कोड असलेली प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. पदवीचे डुप्लिकेट प्रमाणपत्र एकदा देण्याची अट देखील रद्द झाली आहे. सध्या ती प्रक्रिया ऑफलाईन स्वरूपात आहे. ही प्रक्रिया कमी वेळेत करण्याचे विद्यापीठाचे प्रयत्न सुरू होते. विद्यार्थी हितासाठी याबाबत अधिसभा सदस्य ॲड. अभिषेक मिठारी यांनी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यांनी प्रमाणपत्रावर क्यूआर कोड देण्यासह पदवीचे दुबार प्रमाणपत्र एकदाच घेण्याची अट शिथिल करण्याची मागणी केली. त्यावर सकारात्मक कार्यवाही विद्यापीठाच्या पदवीदान आणि संगणक विभागाने केली. यंदाच्या प्रमाणपत्राची छपाई पूर्ण झाली आहे, त्यामुळे क्यूआर कोड पुढील वर्षीच्या 61 व्या दीक्षान्त समारंभावेळी पदवी प्रमाणपत्रावर दिला जाणार आहे.
विद्यार्थ्यांकडून पदवी प्रमाणपत्र गहाळ झाल्यास आता फक्त एकदाच दुबार प्रमाणपत्र मिळते. शिवाय त्यासाठी शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर ॲफिडेव्हिट म्हणजेच प्रतिज्ञापत्र करावे लागते. पोलिस ठाण्यात एफआरआय द्यावी लागते. मात्र, आता त्यातील ॲफिडेव्हिट आणि एकदा प्रमाणपत्र देण्याची अट दंडक समितीने रद्द केली आहे. या दोन्ही निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पदवीच्या प्रत्येक प्रमाणपत्रावर असणार QR Code
प्रत्येक विद्यार्थ्याच्या पदवी प्रमाणपत्रावर वरच्या बाजूला क्यूआर कोड (Shivaji University) दिला जाणार आहे. हा कोड स्कॅन केल्यानंतर त्या प्रमाणपत्राची पडताळणी ऑनलाईन होणार आहे. त्यात विद्यार्थ्याचे नाव, पीआरएन नंबर, विषय, उत्तीर्णतेचे वर्ष आदी माहिती क्षणात मिळणार आहे. नोकरी तसेच उच्च शिक्षणासाठी या प्रमाणपत्राची पडताळणी प्रक्रिया सोपी आणि वेगवान होणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी सांगितले. क्यूआर कोडचा निर्णय आता झाला. त्यापूर्वी यंदाच्या ५० हजार प्रमाणपत्राची छपाई पूर्ण झाली आहे. त्यामुळे प्रमाणपत्रावर क्यूआर कोड देण्याची कार्यवाही पुढील वर्षीच्या दीक्षान्त समारंभापासून होईल; अशी माहिती आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com