“स्वप्न मोठं असावं अन जिद्द अधिक मोठी,” हेच कोल्हापूर जिल्ह्यातील यमगे गावच्या बिरदेव सिद्धापा डोणे यांनी आपल्या यशाने सिद्ध करून दाखवले. बिकट परिस्थिती, आर्थिक अडचणी, मेंढपाळ कुटुंबाची पार्श्वभूमी आणि शिक्षणासाठी संघर्ष यावर मात करत बिरदेव यांनी यूपीएससी परीक्षेत देशात 551 वा क्रमांक मिळवला . आता त्यांना भारतीय पोलीस सेवा (IPS) मध्ये नियुक्ती मिळण्याची शक्यता आहे. परिस्थितीवर मात करून याने एवढे मोठे यश संपादन केले आहे. तर याचा हा प्रवास कसा होता हे आज आपण जाणून घेणार आहोत.
प्राथमिक शिक्षण अन केंद्रात पहिला क्रमांक –
बिरदेव यांचे प्राथमिक शिक्षण यमगे येथील विद्यामंदिर शाळेत झाले. मुरगूडच्या जय महाराष्ट्र हायस्कूलमधून दहावी पूर्ण करताना त्यांनी 96 टक्के गुण मिळवत केंद्रात पहिला क्रमांक पटकावला. बारावीमध्येही 89 टक्क्यांसह प्रावीण्य प्राप्त करून ते पुन्हा प्रथम क्रमांकावर आले. त्यानंतर पुण्यातील प्रतिष्ठित सीओईपी मधून त्यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले.
दोन वेळा अपयश –
यूपीएससीसाठी दिल्ली किंवा पुण्यात अभ्यास करण्याचा निर्णय घेताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. वडिलांनी स्पष्ट सांगितलं की महिन्याचे 10-12 हजार रुपये खर्च झेपणार नाहीत. मात्र भाऊ वासुदेव डोणे, जो भारतीय सैन्यात कार्यरत आहे, त्याने आर्थिक जबाबदारी उचलली. दोन वेळा अपयश आलं, तरीही बिरदेव खचले नाहीत. तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी यश मिळवलं.
जिद्दीबरोबरच त्यांच्या कुटुंबाचा मोठा वाटा –
यूपीएससी निकाल जाहीर झाला, त्यावेळी बिरदेव आपल्या पालकांसह कर्नाटकातील बेळगावजवळच्या अथणी येथे मेंढ्यांसोबत होते. गावकऱ्यांनी जल्लोष केला, पण बिरदेव मात्र आपल्या मूळ जीवनशैलीत रमलेले. निकालानंतर पालावरच त्यांचा धनगरी फेटा बांधून सत्कार करण्यात आला. बिरदेव डोणे यांच्या यशामागे त्यांच्या जिद्दीबरोबरच त्यांच्या कुटुंबाचा मोठा वाटा आहे. वडिलांचे मार्गदर्शन, भावाने दिलेली साथ अन शिक्षणाच्या काळातील संघर्ष यामुळे त्यांनी आयपीएस अधिकारी बनण्याच्या दिशेने मोठं पाऊल टाकलं आहे.