करिअरनामा ऑनलाईन । राज्यस्तरावरील सहाय्यक प्राध्यापक (SET Exam 2024) पदासाठीची पात्रता परीक्षा (SET) दि. 7 एप्रिल 2024 रोजी पार पडणार आहे. या परीक्षेची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरु होईल; अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
विद्यापीठाकडून 1995 सालापासून महाराष्ट्र आणि गोवा राज्यासाठी दरवर्षी सेट परीक्षा घेतली जाते. आता विद्यापीठाकडून शेवटच्या ऑफलाइन सेट परीक्षेचे आयोजन करण्यात येत आहे. यासंबंधीची घोषणा यापूर्वी करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच ऑनलाइन अर्ज प्रक्रियेसंबंधीची घोषणा होणे अपेक्षीत होते. अखेरीस सेट विभागाच्या वतीने संभाव्य तारखेची माहिती देण्यात आली आहे. उमेदवारांना परीक्षा अर्ज भरण्यासाठी सुमारे एक महिन्यांचा कालावधी दिला जातो. त्यानंतर परीक्षा अर्जांची छाननी, प्रवेशपत्र तयार करणे, आदी गोष्टींसाठी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. सध्या विद्यापीठामध्ये सेट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे संच तयार करण्याच्या कामाला वेग आला असून, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. ती झाल्यानंतरच ऑनलाईन अर्जांना सुरुवात होणार आहे.
ही असेल शेवटची ऑफलाईन SET परीक्षा (SET Exam 2024)
मागील काही वर्षांपासून नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे (NTA) नेट परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जात आहे. पुणे विद्यापीठातर्फे सेट परीक्षा ऑनलाइन घेतली जाणार की ऑफलाईन याबाबत शंका होती. विद्यापीठ अनुदान आयोग पुरस्कृत समितीची ऑक्टोबर महिन्यात एक बैठक झाली. त्या बैठकीत सर्वसाधारणपणे एप्रिल २०२४ मध्ये होणारी सेट परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घ्यावी; मात्र त्यानंतरच्या पुढील सर्व (SET Exam 2024) परीक्षा या ऑनलाइन पद्धतीने घ्याव्यात, असे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार ७ एप्रिल २०२४ मध्ये शेवटची ऑफलाईन म्हणजेच लेखी परीक्षा पार पडणार आहे. त्यानंतर ४० वी सेट परीक्षा ऑनलाइन (संगणकावर) पद्धतीने आयोजित होईल, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.
सेटच्या ३९ व्या परीक्षेची घोषणा झाली असून ७ एप्रिल २०२४ रोजी पार पडणाऱ्या परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका संच तयार करण्याच्या कामाला वेग आला आहे. ही प्रक्रिया जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात संपेल, त्यानंतर लगेचच उमेदवारांना ऑनलाइन अर्जासाठी संकेतस्थळ खुले करण्यात येईल; असे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com