करिअरनामा आॅनलाईन | मराठा समाजाच्या १३ टक्के जागा सोडून पोलीस भरती काढू, असं बोलणं म्हणजे समाजाच्या डोळ्यात धूळफेक केल्याचा प्रकार आहे. म्हणजे सरकारला आरक्षणाचा मुद्दा निकाली काढायचा नाहीये का? अशी शंका लोकांना येत आहे,” असा आरोप करत छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आधी आरक्षण आणि मगच भरती घेण्याची विनंतीवजा सुचना सरकारला दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीस अंतरिम स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारने पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. आता या पोलीस भरतीच्या निर्णयाला विरोध होऊ लागला आहे. यापार्श्वभुमीवर छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी ट्विट करुन आपली भूमिका मांडली आहे. “आधी आरक्षण आणि मगच भरती! हीच मराठा समाजाची भूमिका आहे. मराठा समाजाच्या १३ टक्के जागा सोडून पोलीस भरती काढू, असं बोलणं म्हणजे समाजाच्या डोळ्यात धूळफेक केल्याचा प्रकार आहे. म्हणजे सरकारला आरक्षणाचा मुद्दा निकाली काढायचा नाहीये का? अशी शंका लोकांना येत आहे,” असं संभाजीराजे म्हणाले आहेत.
मराठा समाज इतर कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही, हे मी पुन्हा पुन्हा सांगतोय. इतर सर्व समाज मराठा समाजाच्या सोबत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वंशजांनी सुद्धा मराठा समाजाच्या आरक्षणाला सरकारने प्राधान्य द्यावं, हीच भूमिका घेतली आहे. त्यांचे मी समाजाच्या वतीने जाहीर आभार व्यक्त करतो,” अशा शब्दात संभाजीराजे यांनी आभार व्यक्त केले आहेत.
यापुढे कोणत्याही प्रकारची सरकारी नोकर भरती काढली जाऊ नये, मग ती पोलीस भरती असो की ‘एमपीएससी’ची किंवा आणखी कुठलीही असो. मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय निकाली लागल्याशिवाय भरती नको. सरकारने पोलीस भरतीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा. ही समाजाच्या वतीने विनंती वजा सूचना आहे,” असा इशाराही संभाजीराजे यांनी सरकारला दिला आहे. तसेच यापुढे कोणत्याही प्रकारची सरकारी नोकर भरती काढली जाऊ नये, मग ती पोलीस भरती असो की ‘एम पी एस सी’ ची किंवा आणखी कुठलीही असो मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय निकाली लागल्या शिवाय भरती नको.
दरम्यान, सरकारने १३ टक्के जागा मराठा समाजासाठी ठेवाव्यात अशी मागणी आधी करण्यात आली होती. त्यानंतर राज्यात पोलीस भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मंत्रिमंडळानंही या निर्णयाला मंजुरी दिली आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाच्या अमलबजावणीस स्थगिती दिली असल्यानं मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे भरतीला विरोध होऊ लागला आहे.