Pet Exam 2024 : पुणे विद्यापीठाची ‘पेट’ परीक्षा लवकरच; ‘या’ महिन्यात द्यावा लागणार पेपर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सावित्रीबाई फुले पुणे (Pet Exam 2024) विद्यापीठाच्या पीएच.डी. प्रवेशची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची माहिती हाती आली आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यात पी. एच.डी. प्रवेश पूर्व परीक्षा (Ph.D Pet Exam) घेण्याच्या निर्णयास विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. यामुळे पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील संशोधन केंद्रात विद्यार्थ्यांना पी. एच.डी. प्रवेशाची संधी लवकरच मिळणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे (Savitribai Phule Pune University) कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी व्यवस्थापन परिषदेची बैठक घेण्यात आली. या बैठकीस विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र विखे-पाटील ,डॉ. देविदास वायदंडे, डी. बी. पवार, सागर वैद्य, बागेश्री मंठाळकर आदी उपस्थित होते.

पीएच. डी. प्रवेशाच्या जागा काही प्रमाणात कमी होणार (Pet Exam 2024)
पी. एच.डी प्रवेश प्रक्रिया केव्हा सुरू होणार याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता होती. मात्र, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नवीन नियमावलीनुसार पी. एच.डी.प्रवेश प्रक्रिया राबवण्यासाठी आवश्यक तयारी सुरु होती. यापुढील काळात ज्या ठिकाणी रिसर्च सेंटर आहे, त्याच ठिकाणच्या रिसर्च गाईडला पीएच.डी.साठी विद्यार्थी घेता येणार आहेत. त्यामुळे पुढील काळात पी. एच. डी. प्रवेशाच्या जागा काही प्रमाणात कमी होणार आहेत.

यापूर्वी विद्यापीठातर्फे नोव्हेंबर 2022 मध्ये पीएच.डी. प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यानंतर वर्षभरानंतर प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. विद्यापीठातर्फे पीएच.डी. प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश पूर्व परीक्षा येत्या फेब्रुवारी महिना अखेरीस होण्याची शक्यता आहे. तसेच जानेवारी महिन्याच्या (Pet Exam 2024) पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात याबाबत जाहिरात प्रसिद्ध करुन विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागवले जाण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी दिला जाणार आहे. त्यामुळे ज्यांना पीएच.डी.साठी प्रवेश घ्यायचा आहे; त्यांनी दिलेल्या कालावधीत अर्ज करायचा आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com