करिअरनामा ऑनलाईन । परदेशात शिक्षणासाठी गेलेल्या (OBC Scholarship) ओबीसी विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. हे विद्यार्थी आर्थिक संकटात असल्याने शासनाने याबाबत दखल घेऊन तातडीने कार्यवाही केली आहे. आता परदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील (OBC) विद्यार्थ्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे 12 कोटी 88 लाख शासनाने मंजूर केले असून इतर मागास व बहुजन कल्याण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे.
शिष्यवृत्तीचे 12 कोटी 88 लाख रुपये शासनाकडून मंजूर
परदेशात उच्च शिक्षणासाठी जाऊ इच्छिणाऱ्या ओबीसी समाजातील 50 विद्यार्थ्यांना इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे शिष्यवृत्ती दिली जाते. सरकारने 30 ऑगस्टला या विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर केली. त्यातील काही विद्यार्थ्यांचे महाविद्यालय सुरू झाल्याने ते परदेशातील (OBC Scholarship) विद्यापीठांमध्ये दाखलही झाले. परदेशात जाण्यासाठी विमानाच्या तिकिटांची रक्कम, तेथील वसतिगृहाचे भाडे, शिक्षण शुल्क, विमा शुल्क, तसेच दैनंदिन गरजांसाठीची रक्कम देण्याचे सरकारने जाहीर केले; परंतु ते मिळाले नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक चणचण भासू लागली. विद्यार्थ्यांनी बहुजन कल्याण विभागाकडे विचारणा केली असता, काही दिवसांत पैसे खात्यावर जमा होणार असल्याने तूर्तास विद्यार्थ्यांना स्वत:चे पैसे खर्च करा, असे सांगण्यात आले. शासनाने 2023-2024 या वर्षांसाठी 50 ओबीसी विद्यार्थ्यांची परदेशी शिष्यवृत्तीसाठी निवड केली आहे. त्यापैकी या वर्षांतील 32, तर गेल्या वर्षांतील दोन विद्यार्थ्यांसाठी 12 कोटी 88 लाख रुपये मंजूर केले आहेत.
विद्यार्थ्यांना सतावते आर्थिक चणचण (OBC Scholarship)
ब्रिटनमध्ये उच्च शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांनी प्रसार माध्यमांसमोर त्यांना सतावत असलेल्या आर्थिक अडचणीची माहिती दिली. “घराकडून आणलेले पैसे संपले आहेत. हॉस्टेलच्या भाडय़ासाठी मालकाने तगादा लावला आहे. आम्ही सरकारच्या भरवशावर परदेशात आलो. अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता प्रक्रिया सुरू असल्याचे उत्तर मिळते;” असं एका विद्यार्थिनीने सांगितले.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com