करीयर मंत्रा|सदर शोकांतिका का लिहावीशी वाटली… तर या चालू वर्षातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अर्थातच Mpsc च्या निघालेल्या कमी जागा त्या म्हणजे राज्यसेवा, एसटीआय, पीएसआय, असिस्टंट यांच्या आणि या स्पर्धा परीक्षा दुनियेच्या स्वप्ननात रंगलेली लाखों मुले यांसाठी… मी 2011-12 ला Mpsc चा अभ्यास चालु केला, काय केलं या 6/7 वर्षात याचा मनात जरा विचार केला तर सगळं आयुष्य चेहऱ्यासमोरच आलं. जवळपास 6 वर्ष mobile वापरला नाही. सगळया मित्रांपासून अलिप्त झालो. माझा ड्रेस कोड हा ‘ट्रॅक पँट आणि टी शर्ट’ झाला, महिन्यात 25 दिवस सकाळी 7 ते रात्री 10 पुर्ण वेळ अभ्यास केला, असं करत करत वर्षामागुन वर्ष गेले. डोक्याचे निम्मे केस पांढरे झाले, टक्कल पडलं त्याची शोकांतिका तर वेगळीच.
हे करत असताना चांगले-वाईट अनुभव आलेत. तेवढी प्रगल्भताही आलीच. कोणत्याही गोष्टीचा विचार करताना 10 angle ने विचार करायला शिकलो. आपले सन्माननीय पंतप्रधान पण वेड्यात काढु शकत नाही, एवढा जास्त सगळ्या विषयांचा अभ्यास झाला. माझ्या बुद्धीची जाहिरात करत नाहीये, अगदी जे खरं तेच बोलतोय. परंतु बऱ्यापैकी जास्त वाईट अनुभव आलेत हया क्षेत्रात, जे लोक अगोदर भाऊ-भाऊ करायचे तेच लोक आता भु-भु करायला लागलेत. खुपच जास्त वाईट वाटतं ज्या लोकांसाठी, ज्यांना कधी काळी आपण अंगावरचे कपडे काढुन द्यायचो व इतर वाटेल जे करायलाही तयार व्हायचो. त्यांना मात्र आता त्याची किंमत राहीलेली नाही. घरच्यांचे तर बरेच जास्त उपकार झाल्यासारखे वाटतात. जे एवढे वर्ष अविरहितपणे पैशांचा पुरवठा करत राहिले. माझ्या सारख्या पोराला एवढे वर्ष पोसले, फक्त एकाच अपेक्षेवर की आपला पोरगा अधिकारी होईल. अजुनपण पैसे देण्यासाठी थकत नाहीत ते, कधी कधी तर खुप जास्त एकटं पडल्यासारखं वाटत.
एकटं असताना विचार येतो की, आपले सगळे मित्र किती निवांत आयुष्य जगतात. सगळे settle झाले आहेत, निवांत फिरतात, मज्जा करतात, पार्ट्या करतात, आता तर बऱ्याच जणांची लग्न झाली आहेत. याबाबतीत आपण कुठे आहोत तर आपण कुठेच नाही. काही लोक तर ‘सुजित पोकळे’ हे नावपण विसरले असतील. असो, हे सगळं आपल्यालापण करता आलं असत. पण हे फक्त एकाच गोष्टीमुळे करता नाही आलं ते म्हणजे Mpsc…mpsc आणि mpsc. काही वेळेस डोळ्यातुन पाणी सुद्धा येत. ही शोकांतिका मात्र कोणीच नाही समजु शकत. माझ्या मते तर एका दृषिकोनातून विचार केल्यास, जगातले जे काही शोषण होत असतील ते सगळे mpsc च्या मुलांवर होत असतील. Mpsc मध्ये फक्त क्लासवाले, library (अभ्यासिका) वाले, room वाले, mess वाले, चहावाले मोठे होतात. थोडे फारच (0.1%) लोक यशस्वी होतात. त्यांचचं आयुष्य चांगलं होतं, पण जे अपयशी होतात त्यांचं जगणं खुप अवघड आहे. जमलं तर सदाशिव पेठेमध्ये एकवेळ येऊन नक्की पहा…
नवीन तयारी करण्याऱ्या मुलांना खुप कळ-कळीची विनंती आहे. एकतर इकडे येऊच नका आणि जरी आले तरी 2-3 वर्षापेक्षा जास्त दिवस तयारी करू नका. जगात मोठे होण्यासाठी खुप पर्याय आहेत. अधिकारी होणं म्हणजेच सगळं जग नाही, त्यांच्यापेक्षासुद्धा जगात भारी लोक आहेत आणि सध्या बनतही आहे. ह्या class वाल्यांनी तर हया क्षेत्राला एक वलय (आभासी दिवास्वप्न दाखवून) प्राप्त करुन दिलय. क्लासवाले आणि फक्त हे क्लासवाले मस्तपैकी पुणे शहरात चांगले settle झाले आहेत. ते पण ग्रामीण भागातल्या कुटुंबाचं , त्यांच्या मुलांना खोटी स्वप्ने विकून त्यांचे आर्थिक शोषण करून. त्यामुळे Mpsc कडे वळणाऱ्या मुलांनी नीट या क्षेत्रातल्या लोकांशी ( म्हणजे व्यावसायिक उद्देश् नसलेल्या लोकांशी ) चर्चा करूनच इकडे या. नाहीतर Mpsc च्या अपयशी मुलांचं जगणं खुप जास्त अवघड असत. जे मी स्वतः अनुभवतो आहे. न कारे बाबांनो स्वतःचा आयुष्याचा खेळ करू, खुप पोट तिडकीने लिहलं आहे हे, लोकांना दुसऱ्याचा संघर्ष चांगला वाटतो. मला नव्हतं रे कोणी सांगायला नाहीतर कधीच आलों नसतो या दलदलीत…
समर्पित :- संपुर्ण Mpsc च्या मुलांना…
सुजीत पोकळे, जुन्नर