करिअरनामा ऑनलाईन । घरची परिस्थिती आणि आपल्यावर असलेली (MPSC Success Story) कुटुंबाची जबाबदारी पार पाडत आपल्या ध्येयकडे वाटचाल करणारे अनेक ध्येयवेडे तरुण समाजात आहेत. यापैकी एक म्हणजे कोल्हापुरातील सुशांत उपाध्ये… संगणक अभियंता असलेला सुशांत याने काही काळ पत्रकारिता केली आता तो थेट राज्याच्या पोलीस दलात अधिकारी झाला आहे.
अपघातात मेंदूला बसला मार
सुशांत हा कोल्हापूरच्या जोतिबा डोंगरावरील (वाडी रत्नागिरी) रहिवासी. हे महाराष्ट्रातील प्रसिध्द पर्यटन आणि धार्मिक क्षेत्र असल्याने येथे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. शालेय शिक्षण पूर्ण झाले की इथली बरीच मुलं लहान वयात रोजगाराकडे वळतात. सुशांतचे वडील परंपरागत जोतीबाचे पुजारी. सुशांत अवघा ७ वर्षाचा असताना त्याचा एक अपघात झाला. यात त्याच्या मेंदूला मारही लागला. यामुळे सुशांत नेहमी (MPSC Success Story) शांत शांत असायचा. यामुळे पुढे जाऊन हा शिकेल की नाही अशी त्याच्या घरच्यांना काळजी वाटत होती. अशातच सुशांतला जोतिबा डोंगरावरीलच ज्योतिर्लिंग विद्यालयात दाखल करण्यात आले. शिक्षण घेताना सुरुवातीला त्याला त्रास झाला; दरम्यान त्याच्यावर उपचार ही सुरु होते. सुशांतच्या प्रकृतीत सुधारणा होत होती आणि तो इयत्ता पहिली पासूनच शाळेत अव्वल क्रमांक मिळवू लागला. तर २००७ साली दहावीत त्याने ७५ टक्के गुण मिळवत शाळेत पहिला क्रमांक पटकावला.
ST मधील नोकरी नाकारत पत्रकारिता निवडली (MPSC Success Story)
सुशांतने पुढेही शिकत राहायचं ठरवलं आणि २००८ साली वारणा नगर इथे महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रवेश घेतला. १२ वी नंतर त्याने कोल्हापुरातील विवेकानंद कॉलेज आणि शहाजी कॉलेजमधून B.Sc ची डिग्री घेतली. त्यानंतर BCA च्या दुसऱ्या वर्षात असताना तो पहिल्यांदा IBPS ची परीक्षा उत्तीर्ण झाला. त्याला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ ST मध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली. पण त्याला आवडीच्या क्षेत्रात काम करायचं असल्याने त्याने ST मधील नोकरी नाकारून पत्रकारिता करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्याने २०१५ साली शिवाजी विद्यापीठात पत्रकारिता अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. पत्रकारितेत शिक्षण घेत असतानाच सुशांतने एका खाजगी वृत्तवाहिनी आणि जिल्हा माहिती कार्यालय येथे इंटर्नशिप पूर्ण केली. २०१७ साली एका दैनिकात त्याने काम केलं. सोबतच स्वतःची जाहिरात आणि पब्लिक रिलेशन एजन्सी ही सुरू केली.
सुशांत असा झाला PSI
सुशांतचे काम उत्तम रीतीने सुरू होतं. मात्र त्याला स्पर्धा परीक्षा देण्याची इच्छा होती. यामुळे त्याने २०१८ साली दैनिकातून राजीनामा दिला आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागला. मुळातच अभ्यासात हुशार असलेल्या सुशांतने २०१९ साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा आणि नंतर मुख्य (MPSC Success Story) परीक्षाही उत्तीर्ण केली. दरम्यानच्या काळात कोरोना आल्याने भरती थांबली. या काळात शांत न बसता त्याने भरतीसाठी आवश्यक असलेल्या शारीरिक तंदुरुस्तीकडे लक्ष दिले. व्यायाम आणि मैदानी खेळांचा सराव तो नियमितपणे करत असे. नंतर तो नाशिकच्या पोलीस अॅकॅडमीत दाखल झाला. गुडघ्याची दुखापत सहन करुन त्याने खडतर ट्रेनिंग पुर्ण केले. मोठ्या दिमाखात दीक्षांत समारंभही पार पडलाआणि त्याची आता नागपूर इथे पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे.
सुशांत हा त्याच्या गावातील पहिला MPSC पास झालेला मुलगा असल्याने गावात त्याचे कौतुक आहे. जोतीबाच्या डोंगरावरचा गरीब पुजारी कुटुंबातील मुलाचा पत्रकार ते अधिकारी हा प्रवास अनेक तरुणांना प्रेरणा देणारा आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com