करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC Results 2021) गेल्या वर्षी 7 ते 9 मार्च दरम्यान घेतलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा 2021 चा अंतिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेमध्ये प्रमोद बाळासाहेब चौगुले याने सर्वसाधारण उमेदवारांमधून राज्यात पहिला क्रमांत पटकावला तर सोनाली अर्जुनराव म्हात्रे हिने मुलींमधून पहिला क्रमांक पटकावला आहे. तसेच विशाल महादेव यादव हा मागासवर्ग उमेदवारांमधून राज्यात प्रथम आला आहे. हा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. त्यानुसार एकूण 405 पदांकरीता उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे.
निकालाच्या आधारे शिफारस पात्र न ठरलेल्या उमेदवारांना उत्तरपुस्तिका, उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची असल्यास गुणपत्रके त्यांच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध झाल्याच्या दिनांकापासून दहा दिवसांत आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक (MPSC Results 2021) आहे. यासंदर्भात आयोगाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांना सर्वसाधारण सूचना दिल्या असल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिली आहे.
या वर्षी 28 फेब्रुवारी रोजी या परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झाली होती आणि त्यानंतर आता याच मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल एमपीएससीकडून संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे.
प्रमोद चौगुलेने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी (MPSC Results 2021)
राज्यसेवा 2021 सालचा अंतिम निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये सांगलीचा प्रमोद चौगुले सलग दुसऱ्यांदा राज्यात पहिला आला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर कोल्हापूरच्या शुभम पाटीलने बाजी मारली आहे. मुलींमध्ये बीडच्या सोनाली म्हात्रे हिने पहिला क्रमांक पटकवला असून ती राज्यात तिसरी आली आहे. प्रमोद चौगुले हा सध्या उद्योग आणि उपसंचालक या पदावर नाशिक येथे कार्यरत आहे. गेल्या वर्षीही तो राज्यात पाहिला आला होता.
राज्यात पहिला आलेल्या प्रमोदचे वडील टेम्पो चालक आहेत तर आईने शिवणकाम करून संसाराचा गाडा चालवला आहे. 2020 मध्ये प्रमोद चौगुलेने एमपीएससीमध्ये पहिला येण्याचा बहुमान मिळवला होता आणि त्यानंतर त्याची उद्योग विभागात उपसंचालक म्हणून नियुक्ती झाली होती.
कोल्हापूरचा शुभम पाटील राज्यात दुसरा
राज्यात दुसरा आलेला शुभम पाटील हा मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील साजनी या गावचा आहे. शुभमचे वडील गणपती पाटील हे प्राथमिक शिक्षक तर आई गृहिणी आहे. लहानपणापासून सरकारी अधिकारी व्हायचं हे शुभमचं स्वप्न होतं. त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याच्या (MPSC Results 2021) आई-वडिलांनी त्याला साथ दिली.
शुभमने 2020 सालची राज्यसेवा परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात तो राज्यात 22 वा आला. अतिशय काटेकोरपणे अभ्यासाचे नियोजन केल्यामुळे शुभमला हे यश मिळालं आहे. यंदाच्या निकालात राज्यात दुसरा येण्याचा मान त्याने मिळवला आहे.
मुलींमधून सोनाली मात्रे राज्यात पहिली (MPSC Results 2021)
बीड जिल्ह्यातील माजलगावच्या सोनाली अर्जुन मात्रे हिने एमपीएससी परीक्षेत बाजी मारली आहे. सोनालीने सर्वसाधारण यादीत तिसरा तर राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. सोनालीच्या या यशामुळे परिसरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सोनाली मात्रेचे वडील शेतकरी असून एका शेतकरी कन्येने हे यश मिळवल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com