करिअरनामा ऑनलाईन ।महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चासह अन्य राजकीय नेतेमंडळींसह विद्यार्थी संघटनांनी केली आहे. मात्र, परीक्षा ठरल्याप्रमाणे 11 ऑक्टोबरलाच होणार असून राज्यातील अडीच लाख विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रही वितरीत करण्यात आले आहेत. तत्पूर्वी, आयोगाने 16 सप्टेंबरला परीक्षेबाबत सरकारला विचारणा केल्यानंतर सरकारच्या निर्णयानंतरच परीक्षेचे नियोजन करण्यात आल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, परीक्षेचा निकाल मराठा आरक्षणावरील निर्णयानंतर जाहीर केला जाणार आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव तथा संसर्ग वाढला आहे. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे आरक्षणावरील निर्णयानंतर आणि कोरोनावरील लस निघाल्यानंतरच परीक्षा घ्यावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे. दुसरीकडे आज राज्यसेवेची पूर्व परीक्षा पुढे ढकलावी, या मागणीसाठी ” बाहेर आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी परीक्षा काही दिवस पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आयोगाने सरकारचा अभिप्राय घेऊन परीक्षेचे फेरनियोजन केले. त्यानुसार 11 ऑक्टोबर ही तारीख निश्चित करण्यात आली. त्यानंतर आयोगाने विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेशपत्रही वितरीत करुन परीक्षा केंद्रांवर सॅनिटायझिंगही करुन घेतले. त्यामुळे आता परीक्षा रद्द तथा पुढे ढकलणे अशक्य असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सहसचिव सुनिल आवताडे यांनी स्पष्ट केले की ‘एमपीएससी’ची राज्य सेवेची पूर्व परीक्षा कधीपर्यंत घ्यावी, याबद्दल आयोगाने 16 सप्टेंबरला सरकारकडे विचारणा केली होती. त्यानुसार आयोगाने 11 ऑक्टोबरला परीक्षा घेण्याचे नियोजन केले. अडीच लाख विद्यार्थ्यांना परीक्षेचे प्रवेशपत्रही वितरीत करण्यात आले आहेत. सरकारच्या निर्णयानुसार परीक्षा झाली तरीही आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत निकाल जाहीर केला जाणार नाही.
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com