MBA प्रवेश प्रक्रिया ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात

करिअरनामा ऑनलाईन ।एमबीए / एमएमएस अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येईल, पदवीच्या अंतिम वर्षाचे निकाल घोषित झाल्यानंतर पुढील प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येईल असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

सामंत म्हणाले, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे एमएएच – एमबीए / एमएमएस – २०२० ही सामाईक प्रवेश परीक्षा दिनांक १४ व १५ मार्च २०२० रोजी घेण्यात आलेली आहे. या परीक्षेचा निकाल दिनांक २३ मे, २०२० रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. एमएएच – एमबीए / एमएमएस – २०२० च्या प्रवेश प्रक्रियेबद्दल विद्यार्थ्यांनी संभ्रम निर्माण करून घेऊ नयेत. याबाबतची अद्ययावत माहिती विद्यार्थ्यांना वेळोवेळी देण्यात येईल, असेही सामंत यांनी सांगितले.

राज्यभरातील एमबीए अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमबीए-एमएमएस सीईटी होऊन २३ मे रोजी निकालही जाहीर झाला मात्र त्यानंर सीईटी सेलने प्रवेशाबाबतीत काहीच सूचना न दिल्याने विद्यार्थी संभ्रमात होते. एमबीएची प्रवेश परीक्षा १४ आणि १५ मार्च रोजी राज्यातील १४८ केंद्रावर झाली होती. या परीक्षेसाठी राज्यभरातून एक लाख १० हजार ६३१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. परीक्षेत चार विद्यार्थ्यांना २०० पैकी १५० हून अधिक गुण मिळाले आहेत तर १२६ ते १५० पर्यंत गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा आकडा ३९२ आहे. ५१ ते १०० पर्यंत गुण मिळवणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने आहेत.

सीईटी सेलच्या वतीने या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेली पहिलीची सीईटी परीक्षा सुरळीत पार पडल्यानंतर निकालही जाहीर करण्यात आले आहे. मुंबईसह राज्यातील एमबीए अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारित असलेल्या कॉलेजांमध्ये सुमारे ३६ हजार ७६५ हजार जागा आहेत. या जागावर सीईटीत मिळालेल्या गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येणार आहे.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careenama.com