करिअरनामा आॅनलाईन | राज्यातील पोलिसांवर सध्या कामाचा अतिरिक्त ताण पडला आहे. पोलिसांचे वाढलेले काम, तपासाशिवाय पडून असलेली ढीगभर प्रकरणे, कोरोनामुळे झालेला पोलिसांचा मृत्यू, पदोन्नतीने रिक्त झालेल्या जागांमुळे आणि सेवानिवृत्ती व बडतर्फ, निलंबनामुळे राज्यात पोलिस दलातील रिक्त पदांची संख्या वाढली आहे. या पार्श्वभूमीवर वर्षाअखेर मोठी पोलिस भरती होण्याची शक्यता गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांनी व्यक्त केली आहे. प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अपर पोलिस महासंचालकांनी जानेवारी 2021 ते डिसेंबर 2022 या काळातील रिक्त पदांची माहिती तातडीने मागविली आहे. परंतु, मराठा आरक्षणाला स्थगिती असल्याने भरतीसंदर्भात सरकारने घोषणा केली नसल्याची चर्चा आहे. Maharashtra Police Bharti 2020
राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील पोलिस शिपाई आणि चालक पोलिस शिपायांची किती पदे रिक्त आहेत, याची माहिती अप्पर पोलिस महासंचालक कार्यालयास तत्काळ ऑनलाइन सादर करावी, असे आदेश शुक्रवारी (ता.23) दिले. त्यात सर्व पोलिस आयुक्त (लोहमार्ग- मुंबईसह), पोलिस अधीक्षक (नाशिक ग्रामीण वगळून), पोलिस आयुक्त (बृहन्मुंबई), सर्व समादेशक (राज्य राखीव पोलिस दल गट क्र. एक ते 16) यांच्याकडून रिक्त पदांची माहिती संकलित करण्यात आली आहे. याबद्दल लोहमार्गचे अप्पर पोलिस महासंचालक, एसआरपीएफचे अप्पर पोलिस महासंचालक, पोलिस उपमहानिरीक्षक (गडचिरोली परिक्षेत्र, नागपूर), सर्व परिक्षेत्रीय विशेष पोलिस महानिरीक्षक आणि राज्य राखीव पोलिस बलाचे विशेष पोलिस महानिरीक्षक यांचा समावेश आहे. Maharashtra Police Bharti 2020
भरतीनंतर एक वर्षाचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतरच संबंधितांना नियुक्ती दिली जाते. त्यामुळे भरतीचे नियोजन एक वर्षापूर्वीच केले जाते. त्यानुसार मैदाने उपलब्ध करुन भरती प्रक्रिया राबविली जाते. त्यादृष्टीने आता नियोजन सुरु झाले आहे, परंतु मराठा आरक्षणाला स्थगिती असल्याने भरतीसंदर्भात सरकारने घोषणा केली नसल्याची चर्चा आहे.