मुंबई । राज्याच्या पशू संवर्धन विभागात मेगा भरती होणार आहे. माफसू विद्यापीठातंही लवकरच ही भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. नवीन वर्षात ही भरती प्रक्रिया राबवणार असून पशू संवर्धन विभागात तीन हजार जागा भरणार असल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांनी दिली आहे. याशिवाय राज्याच्या ग्रामीण भागात गोटफार्म आणि दुग्ध व्यवसाय वाढवणार असल्याचंही सुनिल केदार यांनी म्हटलं आहे.
तर दुसरीकडे सार्वजनिक आरोग्य विभागातील पदभरतीची प्रक्रिया जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करावी. तसेच राज्यात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असून, सार्वजनिक आरोग्य यंत्रणेने नॉन कोविड रुग्णांच्या सेवेकडे लक्ष द्यावे, असे निर्देश राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
विभागातील पदभरतीला गती मिळावी यासाठी आरोग्यमंत्र्यांनी राज्यातील विभागीय आयुक्त, मागासवर्ग कक्षाचे अधिकारी, आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. नववर्षाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या या बैठकीत आरोग्यमंत्र्यांनी यंत्रणेला अधिक सक्षमपणे आणि सेवेचा दर्जा उंचावण्याचे आवाहन केले.