करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात वणवण फिरणाऱ्या (Job Fair) तरुणांसाठी एक दिलासा देणारी बातमी आली आहे. बेरोजगार तरुणांसाठी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागातर्फे दरवर्षी 16 रोजगार मेळाव्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामध्ये 12 ऑनलाइन आणि 4 ऑफलाईन मेळावे होणार आहेत. महत्वाचे म्हणजे 10 वी पास तरुणांपासून ते पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना या मेळाव्यात सहभागी होता येणार आहे. दि. 29 डिसेंबर आणि दि. 31 जानेवारीपूर्वी असे दोन मेळावे होणार आहेत.
कुशल कामगारांचा अभाव
सध्या अशी परिस्थिती आहे की सरकारी नोकऱ्या मर्यादित असून त्याची भरती देखील वेळेत होत नाही. राज्याच्या विविध विभागांमध्ये दोन लाखांवर पदे रिक्त आहेत. काही पदांची भरती यावर्षी झाली आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे, की सरकारी नोकरीत एका जागेसाठी तब्बल 200 ते 250 उमेदवार अर्ज करतात तर दुसरीकडे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागातर्फे होणाऱ्या रोजगार मेळाव्यासाठी जागांच्या तुलनेत अर्जच येत नाहीत. त्यामुळे कुशल कामगारांचा अभाव निर्माण झाला आहे.
इतक्या तरुणांना मिळणार रोजगार (Job Fair)
जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये दरवर्षी रोजगार मेळावे होतात. काहीवेळा महिन्यातून एकदा तर कधी दोनवेळा मेळाव्यांचे आयोजन केले जाते. आता दि. 29 डिसेंबरला ऑनलाइन मेळावा होणार असून त्याद्वारे जवळपास 700 जणांना रोजगार मिळू शकतो. त्यानंतर दि. 31 जानेवारीपूर्वी विभागीय मेळावा होणार असून त्यातही चार ते पाच हजार तरुण- तरुणींना रोजगाराची संधी मिळण्याची शक्यता आहे. गरजू तरुण-तरुणींनी या मेळाव्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त हणमंत नलावडे यांनी केले आहे.
कोणती कौशल्ये विकसित करता येणार
महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या माध्यमातून ग्राफिक डिझायनर, मोबाईल फोन हार्डवेअर रिपेअर टेक्निशियन, कृषी, ब्युटी ॲण्ड वेलनेस, सोलार पॅनल (Job Fair) इन्स्टॉलेशन, डेअरी प्रॉडक्ट प्रोसेसर, फिटर- फॅब्रिकेशन, ॲनिमेटर, डोमेस्टिक डाटा एन्ट्री ऑपरेटर, इलेक्ट्रिकल-टेक्निशियन, वेब डेव्हलपर, सोलर ॲण्ड एलईडी टेक्निशियन, अशा कोर्सेसच्या माध्यमातून कौशल्य विकासाचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षण संस्थांची निवड झाल्यानंतर बेरोजगार तरुण- तरुणींसाठी ही सोय केली जाणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com