करिअरनामा ऑनलाईन । 10 वी, 12 वी ची परीक्षा देणाऱ्या (HSC SSC Board Exam) विद्यार्थ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना वाढीव वेळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दहावी-बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आता परीक्षेसाठी दहा मिनिटाचा जादा वेळ मिळणार आहे.
राज्य मंडळातर्फे दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी परीक्षेच्या वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिकांचे वाटप विद्यार्थ्यांना यापूर्वी करण्यात येत होते. दरम्यान, दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण टप्पा असल्यामुळे पालकांसह आणि समाज घटकांचेही या परीक्षांकडे बारकाईने लक्ष असते. परंतु प्रश्नपत्रिका मोबाईलवर तसेच अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाल्याच्या अफवा, यांसारख्या घटना काही अंशी घडत असल्याचे निदर्शनास आले.
रद्द करण्यात आलेली सुविधा पुन्हा सुरु होणार
परीक्षेदरम्यान घडणाऱ्या अपरिहार्य घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी आणि परीक्षा भयमुक्त आणि कॉपीमुक्त वातावरणात पार पडाव्यात, यासाठी परीक्षेच्या दिलेल्या वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरित करण्याची सुविधा फेब्रुवारी-मार्च २०२३ च्या परीक्षेपासून रद्द करण्यात आली होती. परंतु (HSC SSC Board Exam) विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन आणि पालक-विद्यार्थी यांच्या मागणीचा विचार करून फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी दहा मिनिटे वेळ वाढवून देण्यात आला आहे. परीक्षेच्या वेळेनंतरची दहा मिनिटे वाढवून देण्यात आली असल्याची माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली.
विद्यार्थ्यांनी वेळेच्या अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर हजर रहावे
फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये सकाळच्या सत्रात 11 वाजता, तर दुपारच्या सत्रात 3 वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येईल आणि लेखनास प्रारंभ होईल. विद्यार्थ्यांनी सकाळच्या सत्रास 10:30 वाजता, तसेच दुपारच्या सत्रात 2:30 वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे; असे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.
परीक्षेची सुधारीत वेळ पहा – (HSC SSC Board Exam)
-परीक्षेची सध्याची वेळ – परीक्षेची सुधारित वेळ
1.सकाळी ११ ते दुपारी २ — सकाळी ११ ते दुपारी २.१०
2. सकाळी ११ ते दुपारी १ — सकाळी ११ ते दुपारी १.१०
3. सकाळी ११ ते दुपारी १.३० — सकाळी ११ ते दुपारी १.४०
4. दुपारी ३ ते सायंकाळी ६ — दुपारी ३ ते सायंकाळी ६.१०
5. दुपारी ३ ते सायंकाळी ५ — दुपारी ३ ते सायंकाळी ५.१०
6. दुपारी ३ ते सायंकाळी ५.३० — दुपारी ३ ते सायंकाळी ५.४०
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com