करिअरनामा ऑनलाईन । यंदा औषधनिर्माणशास्त्र पदविका (D.Pharm Result 2023) अभ्यासक्रमाच्या उन्हाळी परीक्षेचा प्रथम वर्षाचा निकाल अत्यंत कमी लागला. याबाबत राज्य सरकारने फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर औषधनिर्माणशास्त्र पदविका प्रथम वर्षात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेवून ‘कॅरी ऑन’ (Carry on) करण्याची फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाने मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्यावर्षी औषधनिर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रमाला विलंब झाला. हा अभ्यासक्रम वार्षिक आहे. फार्मसी कॉन्सिल ऑफ इंडियाच्या मानकानुसार किमान 180 दिवसांच्या शैक्षणिक कालावधीची पूर्तता झाली नाही. केवळ शंभर ते एकशेवीस दिवसांचाच शैक्षणिक कालावधी मिळाला होता. त्याचा (D.Pharm Result 2023) परिणाम प्रथम वर्षाच्या निकालावर होऊन उन्हाळी परीक्षेचा निकाल पन्नास टक्क्यांपेक्षा कमी लागला. त्यामुळे विद्यार्थी, पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.
निकाल कमी लागल्याने मोठ्या प्रमाणात विद्यार्थी अनुउत्तीर्ण झाल्याबाबत तोडगा काढण्यासाठी औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले होते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर औषधनिर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रमाला शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये प्रवेश घेतलेल्या, प्रथम वर्षाच्या परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना 2023-24 मध्ये द्वितीय वर्षात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला.
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने (एमएसबीटीई) या बाबत नुकतेच परिपत्रकही प्रसिद्ध केले. प्रथम वर्षातील जे अनुत्तीर्ण विद्यार्थी हिवाळी परीक्षा 2023 मध्ये उत्तीर्ण होतील, ते विद्यार्थी (D.Pharm Result 2023) उन्हाळी परीक्षा 2024 पासून द्वितीय वर्षाची परीक्षा देण्यास पात्र होतील. संबंधित विद्यार्थ्यांसाठी उपचारात्मक अध्यापन प्रक्रिया राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com