करिअरनामा ऑनलाईन । डी. एड. अभ्यासक्रमाच्या प्रवेशाबाबत (D.Ed. Admission 2024) एक महत्वाची अपडेट आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संकेतस्थळावर डी.एल.एड. प्रथम वर्ष अभ्यासाच्या प्रवेशाचे वेळापत्रक प्रसिध्द करण्यात आले आहे. विद्यार्थी सोमवार दि.3 जूनपासून डी. एड. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. शासकीय व व्यावसायिक कोट्यासाठी स्वतंत्र वेळापत्रक प्रसिध्द करण्यात आले असून SERT च्या संकेतस्थळावर सविस्तर वेळापत्रकासह प्रवेशाची नियमावली उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार D.L.Ed अभ्यासक्रमास प्रवेश घ्यावा; असे आवाहन राज्यस्तरीय डी. एल. एड. प्रवेश निवड, निर्णय व प्रवेश संनियंत्रण समितीचे अध्यक्ष राहुल रेखाराव यांनी केले आहे.
प्रवेशा संदर्भात महत्वाच्या तारखा (D.Ed. Admission 2024)
12 वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांची विविध अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी गडबड सुरु होते. अनेक अभ्यासक्रमांमधून काही विद्यार्थी 12 वीनंतर डी. एड. अभ्यासक्रमाकडे वळतात. अशा विद्यार्थ्यांना आता 3 जून ते 18 जून या कालावधीत डी. एड. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे. DIET स्तरावर पूर्ण भरलेल्या अर्जाची ऑनलाईन पडताळणी 3 ते 19 जून या कालावधीत केली जाणार असून 26 जून रोजी गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे. प्रवेशाबाबतची सर्व माहिती https://www.maa.ac.in/ या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
D.L.Ed प्रवेशाची पहिल्या फेरीची यादी दि. 27 जून रोजी (D.Ed. Admission 2024) प्रसिध्द करण्यात येणार असून या फेरीतील पात्र विद्यार्थ्यांना दि. 27 जून ते दि. 1 जुलै या कालावधीत प्रवेश घ्यावा लागणार आहे. विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीसाठी दि . 2 जुलै पर्यंत महाविद्यालयांचे विकल्प भरता येणार असून पूर्वी भरलेले विकल्प बदलता येणार आहेत. दि. 4 जुलै रोजी प्रवेशाची दुसरी यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. दुसऱ्या फेरीतून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना येत्या दि. 4 जुलै ते दि. 8 जुलै या कालावधीत प्रवेश घेता येतील. प्रवेशाची तिसरी फेरी दि. 11 जुलै रोजी सुरू होईल. तर की. 15 जुलैपासून प्रथम वर्षांचे प्रवेश सुरू होतील.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com