करिअरनामा ऑनलाईन । लहानपणापासूनच बुद्धीने तल्लख (Career Success Story) आणि अभ्यासात हुशार असलेल्या शिवानीची कठोर प्रयत्नानंतर इस्रो (ISRO) संशोधन संस्थेत तिची निवड झाली आहे. अंतराळ संशोधन कार्यात नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या इस्रो या संशोधन संस्थेत ज्युनिअर रिसर्च फेलो (JRF) म्हणून शिवानी राजीव देशमुख हीची निवड झाली आहे. केवळ दोन पदांसाठी हैदराबाद येथे झालेल्या मुलाखतीमध्ये शिवानीने हे यश मिळवले असून ते यश मिळवणारी ती एकमेव मराठी मुलगी ठरली आहे.
शिवानी देशमुख ही मूळची बुलडाणा जिल्ह्यातील कंधारा (ता. खामगाव) येथील रहिवासी आहे. शिवानीचे वडील राजीव ऊर्फ निळकंठराव हिंमतराव देशमुख हे आर्वी (जि. वर्धा) येथे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतात. त्यामुळे तिचे शिक्षणही तिथेच झाले. शाळा महाविद्यालयातील शिक्षकांचे आणि आई-वडिलांचे मार्गदर्शन मिळाल्यामुळे आपल्याला इस्रोपर्यंत पोहोचता आल्याच्या भावना शिवानीने व्यक्त केल्या आहेत.
प्राध्यापक म्हणून केली नोकरी (Career Success Story)
तिचे बारावीपर्यंतचे शिक्षण आर्वी येथेच झाले. B.Sc. चे पदवी पर्यंतचे शिक्षण तिने अमरावतीच्या शिवाजी कॉलेजमधून घेतले; तर M. Sc. नागपूरच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कॉलेजमधून पूर्ण केले. एवढंच नव्हे तर शिवानीने नेट, सेट या दोन्ही परीक्षाही पास केल्या आहेत. या नंतर ती अमरावतीच्या शिवाजी विद्यालयात सहाय्यक अधिव्याख्याता म्हणून रुजू झाली.
गावाचे नांव पोहचले राष्ट्रीय पातळीवर
शिवानीच्या मूळ गावात, कंझारा येथे तिच्या नातेवाइकांनी (Career Success Story) तिच्या या यशाचा आनंदोत्सव साजरा केला. शिवानीच्या या कामगिरीने खामगाव तालुका, बुलडाणा जिल्ह्याचे, तसेच आर्वीचे नाव राष्ट्रीय पातळीवर उंचावले गेले आहे.
पालक आणि शिक्षकांमुळे मिळाले यश
या कामगिरीविषयी बोलताना शिवानी म्हणते; “मला ईस्रोपर्यंत पोहोचता आले, याचा मला आनंद आहे. शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन अतिशय महत्त्वाचे होते. माझे आई-वडिल माझ्यामागे ठामपणे उभे राहिले. त्यांनी केलेले संस्कार व मार्गदर्शन यामुळेच मला इस्रोमध्ये पोहचता आले आहे.”
“शिवानी ही लहानपणापासूनच अभ्यासात हुशार आहे. तिला संशोधनात गोडी असल्याने तिने विज्ञान विषयात शिक्षण घेतले. श्रीशिवाजी विद्यालयात अध्यापन करीत असताना इस्रोच्या वतीने मिळालेल्या संधीचे तिने सोने केल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तिच्या या यशाने आपल्या महाराष्ट्राचे नाव संशोधन संस्थेत पोहचले आहे; ही खूप मोठी बाब आहे.” असे शिवानीचे वडील राजीव देशमुख म्हणाले.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com