करिअरनामा ऑनलाईन । ‘माझं YouTube चॅनेल आहे; मी व्लॉगर आहे..’ असं (Career Success Story) आपण अनेकांकडून ऐकतो. YouTube ने लोकांमधील सुप्त गुणांना वाव देत कमाईचं महाद्वारच उघडून दिलं आहे. आपण पाहतोय, की या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून हजारो भारतीयांनी आतापर्यंत स्वत:ची लाईफ बनवली आहे. ते महिन्याकाठी लाखो रुपयांची कमाई करत आहेत. केवळ पैसाच नव्हे तर अनेकांना यूट्यूबनं वारेमाप प्रसिद्धीही मिळवून दिली आहे. एखाद्या अभिनेत्या प्रमाणे लोकप्रियता लाभलेल्या गौरव तनेजाचा प्रवास थक्क करणारा आहे. एका मुलाखतीत त्यानं आपल्या कमाईबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत गौरवनं आपल्या कमाईबाबत भाष्य केलं आहे. तो म्हणतो; “माझी कमाई सध्या एअर एशिया कंपनीच्या सीईओपेक्षा जास्त आहे.” गौरवनं एअर एशिया कंपनीचा उल्लेख करण्यामागेही एक कारण आहे. गौरव हा पायलट असून तो एअरएशिया कंपनीत नोकरीला होता. काही कारणामुळं कंपनीनं त्याला नोकरीवरून काढून टाकलं होतं. गौरव हा एक व्लॉगर असून फिटनेस इन्फ्लुएन्सर म्हणूनही तो प्रचंड लोकप्रिय आहे.
उच्च शिक्षित गौरव (Career Success Story)
गौरव तनेजानं दिल्ली विद्यापीठातून कायद्याचा अभ्यास केला आहे. तो खरगपूर आयआयटीचा माजी विद्यार्थी असून तिथून त्यानं सिव्हिल इंजिनीअरिंग केलं आहे. तो त्याची पत्नी आणि अन्य कुटुंबीयांसोबत व्लॉग आणि फिटनेसचे व्हिडिओ बनवतो.
एअर एशियामध्ये होता पायलट
गौरव तनेजा एअर एशियामध्ये पायलट होता. त्यानं 2020 साली त्याच्या व्हिडिओतून एअर एशियावर नियमांच्या उल्लंघनाचा आरोप केला होता. कंपनीच्या वैमानिकांना अनेक प्रकारच्या अडचणींना आणि दबावाला तोंड द्यावं लागतं, असा दावा त्यानं केला होता. या आरोपांनंतर कंपनीनं त्याच्यावर कारवाई करुन त्याला निलंबित केलं होतं. आता एअर एशिया कंपनीच्या सीईओपेक्षाही आपली कमाई जास्त असल्याचं त्यानं म्हटलं आहे.
YouTube चॅनेलचे लाखो चाहते
कोविडची साथ आली; त्यांनंतर लॉकडाऊन लागले (Career Success Story) आणि जनजीवन ठप्प झाले. या काळात गौरव तनेजानं पूर्णवेळ व्हिडिओ निर्मिती सुरू केली आणि अल्पावधीत नाव कमावलं. त्याच्या चॅनेलचे 86 लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत. इन्स्टाग्रामवर त्याचे 40 लाखांहून जास्त फॉलोअर्स आहेत. पत्नी रितू राठी सोबत तो 3 यूट्यूब चॅनेल चालवतो. त्यांची मुलगी देखील व्हिडिओ निर्मितीमध्ये आई-वडिलांसोबत सहभागी असते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com