करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (Career News) पर्यटन क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी एक पाऊल पुढं टाकलं आहे. राज्यातील महिला उद्योजकांना विशेष सवलत देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्याचप्रमाणे या क्षेत्रातील महिलांना केंद्र आणि राज्य शासनाच्या विमा योजनेतही सहभागी करून घेण्यात येणार आहे. यामुळे या क्षेत्रात महिलांचे प्रमाण वाढण्यास मदत होणार आहे.
बचत गटांना होणार फायदा
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मालमत्तांच्या ठिकाणी, महिला बचत गटांना हस्तकला, कलाकृती, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ आदींच्या विक्रीसाठी स्टॉल, जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद्योजकता आणि नेतृत्व गुण विकसित करण्याच्या उद्देशाने महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. यामुळे या क्षेत्रातील संधीही वाढतील आणि महिला सक्षमीकरण होण्यासाठी मदत होणार आहे.
या उद्योगांना मिळणार संधी (Career News)
राज्यातील प्रत्येक तालुक्यामधील पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत महिलांच्या मालकीच्या व त्या चालवत असलेल्या दहा पर्यटन व्यवसायांना चालणा मिळणार आहे. जसं की होम स्टे, हॉटेल, रेस्टारंट, टूर ॲण्ड ट्रॅव्हल एजन्सी आदी उभारणीसाठी महिलांना प्रोत्साहन व सवलती दिल्या जाणार आहेत. नोंदणीकृत व्यवसायांमध्ये कार्यरत महिला सहल मार्गदर्शक, महिला वाहन चालक, महिला सहल संचालक व इतर महिला कर्मचाऱ्यांना यात सामील करून घेण्यात येईल. महिला पर्यटकांनाही आकर्षक सुविधा मिळतील. महामंडळाच्या टूर ऑपरेटरमार्फत आयोजित पर्यटन सर्किट, पॅकेजेसमध्ये महिला पर्यटकांना विविध सवलती देण्यात येत आहेत.
सर्व रिसॉर्ट्स, युनिट्समध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ठराविक कालावधीत फक्त ऑनलाईन बुकिंगमध्ये ५० टक्के सवलत दिली जाणार आहे. महामंडळाच्या रिसॉर्ट्समध्ये महिला पर्यटकांसाठी, अपंग किंवा वृद्ध महिलांकरिता लिफ्टजवळच्या खोल्या उपलब्ध करून देण्यास प्राधान्य, महिलांसाठी विशेष खेळ, मनोरंजन कार्यक्रमांचे आयोजन, महिला पर्यटकांच्या विविध गटांसाठी अनुभवात्मक टूर पॅकेजेस, ज्येष्ठ महिला नागरिकांसाठी सहल अशा विविध विशेष सेवासुविधा पुरविण्यात येतील.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com