प्रेम आणि करिअर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

लव्हगुरु | गौरी नारायण मोरे

श्रावणातल्या सरी नुकत्याच सुरु झाल्या होत्या, तो मातीचा खरपूस वास जिभेला पाणी आणून सोडत होता. रूमवर जाऊन गरमागरम चहा आणि कुरकुरीत कांदाभजी चा बेत करावा म्हणून ऑफिस मधून लवकरच पाय काढला. मुंबईच ट्राफिक म्हणजे जणू तारेवरची कसरतच. ती करत करत रूमवर पोहचले. आलिशाने दरवाजा उघडायला खूप वेळ लावला. माझ्या जिभेवरची चव विरुनच गेली होती. रागाने माझा चेहरा एकदम लालबुंद झाला होता. दार उघडताच माझ्या शब्दाचे मार तिच्यावर होण्याआधी तिच्या चेहऱ्यावरचे निस्तेज भाव तिची ढाल बनून माझ्यासमोर उभे राहिले. मी माझ्या शब्दांचा आवंढा तिथेच गिळला. खूप प्रयत्नांनी मी तिच्या भावनांना वाट मोकळी करून देऊ शकले. तिच्या बोलण्यावरून इतकाच कळलं होतं की तिझ ब्रेकअप झालंय.

बघायला गेलं तर आलिशा माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहानच. तिचा स्वभाव एकदम वेगळा हट्टी, बिनधास्त, जगाशी अपडेटेड, 24 तास ऑन लाईन राहून फेसबुक, व्हाट्स अप, इंस्टा ला पिक अपडेट करणार. गेल्या महिन्यातच ती मला सुजय बद्दल सांगत होती. सुजय तिचा फेसबुक वरचा फ्रेंड. Hii hello नंतर मैत्री वाढत गेली, मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि आता ब्रेकअप.

मग असा प्रश्न पडतो प्रेम करायचाच नाही का? आयुष्यात नक्की कशाला प्रायोरिटी द्यायची? मला वाटत प्रेम हे भावनांशी जोडलं गेलं आहे तर करिअर हे तत्वांशी. आयुष्य जगताना भावना आणि तत्व दोन्ही महत्वाची असतात. या धावपळीच्या जगात दोन क्षण सुखाचे घालवण्यासाठी आपुलकीची माणसं हवीतच. आपल्यावर प्रेम करणारी, जीवाला जीव लावणारी, हक्काने रागावणारी, आपल्यावर रुसणारी मानस तर नक्कीच हवी आहेत. त्यामुळं आयुष्यात प्रेम हे केलंच पाहिजे. पण प्रेमाच्या ओघात वाहून न जाता जीवन जगण्यासाठी ज्या गोष्टींची अावश्यकता आहे त्या पूर्ण केल्या पाहिजेत आणि यामध्ये पहिला नंबर लागतो तो करिअरचा. आयुष्य जगताना प्रेमाला आणि करिअर ला एकाच तागाड्यात तोलायला काही हरकत नाही. प्रेमाचा करिअर वर आणि करिअरचा प्रेमावर शून्य मात्र परिणाम पडता कामा नये. प्रेमात कोणत्याही टर्म्स आणि कंडिशन नसल्या पाहिजेत. कोणत्याही नात्याचं बंधन नसावं, हक्काची भाषा नसावी, ज्याची त्याला स्पेस असावी तरच नातं खोलवर आणि घट्ट रुजत.

आयुष्यात करिअर हे भरल्या ताटाप्रमाणे असावं आणि प्रेम हे ताटातल्या लोणच्याप्रमाणे असावं. जेवढं मुरेल तेवढं त्याची चव खुलवणार. अस्तित्व छोटं पण जाणीव मोठी, त्यामुळं प्रेम भरभरून ओसंडून केलं पाहिजे ना फक्त माणसावर नाही तर करिअर वर, गुरा ढोरांवर, वाहत्या पाण्यावर, निसर्गावर, निर्जीव दगडावर आणि सर्वांत महत्वाचं स्वतःवर…

गौरी मोरे