Army Success Story : टिचभर घरात पाहिली आभाळाएवढी स्वप्नं; धारावी झोपडपट्टीतील तरुण आर्मीमध्ये बनला लेफ्टनंट

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । राखेतून उठून फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप (Army Success Story) घेतलेल्या मुलाची ही संघर्षगाथा आहे. तुम्ही विचारही करु शकणार नाही अशा अनेक आव्हानांवर मात करत हा मुलगा लष्करात अधिकारी झाला आहे. कारण त्याने ठरवलंच होतं.. काहीही होवूदे.. आयुष्यात हार मानायचीच नाही.

थक्क करणारा संघर्ष
उमेश किलू हा मुंबईच्या धारावी झोपडपट्टीत (Dharavi Slum) राहणारा तरुण. धारावी झोपडपट्टीची अवस्था तुम्हाआम्हा सर्वांनाच माहित आहे. सर्वांप्रमाणेच उमेश याचं अगदी छोटंस 10 बाय 5 फुटांचं घर इथे आहे. त्याच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत बिकट. पण उमेशला आयुष्यात पुढे जायचं होतं. त्याला जगावेगळं काहितरी करुन दाखवायचं होतं. कितीही झाले तरी आयुष्यात हार मानायची नाही असं त्यानं ठाम ठरवलं होतं. तो दिवस उजाडला आणि अखेर (Army Success Story) त्याच्या प्रयत्नांना यश आलं, आयुष्यातील खाचखळगे पार करत हा मुलगा लष्करात अधिकारी झाला आहे. धारावी झोपडपट्टीत राहणारा उमेश कीलू भारतीय लष्करात अधिकारी झाला असून त्याने आपल्या कुटुंबासह परिसराचे नाव मोठे केले आहे. चेन्नई येथे ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीमध्ये (Officers Training Academy) पासिंग आऊट परेड पार पडली आणि हा तरुण लेफ्टनंट (Lieutenant) झाला आहे. त्याचा संघर्ष ऐकून तुम्हीही थक्क व्हाल…

10 बाय 5 च्या खोलीत राहत होतं कुटुंब (Army Success Story)
उमेश कीलूचा (Umesh Keelu) जन्म मुंबईतील धारावीच्या सायन कोळीवाडा झोपडपट्टीत झाला. मुंबईतील अत्यंत गजबजलेलं ठिकाण म्हणजे धारावीची झोपडपट्टी. 10 x 5 ची टिचभर खोली आणि पुऱ्या सोयी सुविधा; अशा अनेक अडचणींवर मात करत उमेश आणि त्याचे कुटुंब दिवस काढत होते. डोंगरा एवढ्या आर्थिक अडचणी असतानाही त्याने IT मध्ये B.Sc आणि Computer Science मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले. याबरोबरच त्याने NCC (National Cadet Corp) मधून ‘C’ प्रमाणपत्र मिळवले आहे.

अचानक वडील गेले
उमेशने सांगितले; “माझे वडील पेंटर होते. 2013 मध्ये त्यांना अर्धांगवायू झाला आणि तेव्हापासून ते अंथरुणाला खिळून राहिले. माझ्या सैन्य प्रशिक्षणासाठी रिपोर्ट करण्याच्या एक दिवस आधी मार्च 2023 मध्ये वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचे अंत्यविधी झाल्यानंतर मी प्रशिक्षणासाठी पुन्हा हजर झालो आणि माझे 11 महिन्याचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले आणि सैन्यात ऑफिसर बनलो.

13 व्या प्रयत्नात मिळाले यश
वडिलांच्या निधनानंतर उमेश हा कुटुंबात एकटाच कमावता होता. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्याने सायबर कॅफेमध्ये पार्ट टाईम नोकरी केली (Army Success Story) आणि तेथे त्याने संगणक ऑपरेटर म्हणून काम केले. त्याने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि ब्रिटीश कौन्सिलसह आयटी सेवा क्षेत्रातही काम केले आहे. उमेश कीलूने गेल्या काही वर्षांत सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (SSB) पास करण्यासाठी तब्बल 12 वेळा प्रयत्न केले आहेत. एवढे अथक परिश्रम घेतल्यानंतर तो आता भारतीय सैन्यात अधिकारी झाला आणि त्याने आपल्या पालकांचे स्वप्न पूर्ण केले.

अपयश आले तरी निराश होऊ नका’
तरुणांना सल्ला देताना उमेश सांगतो; “जर तुम्ही तुमच्या जीवनात काही ध्येय ठेवत असाल आणि तुम्ही कठोर परिश्रम करत असाल तर तुम्ही तुमचे ध्येय साध्य कराल. तयार राहा, पुढे जा, सर्व (Army Success Story) समस्यांना तोंड द्या, अडथळ्यांना तोंड द्या. तुम्ही परीक्षेत नापास झालात तरी सराव करत राहा. सल्लागारांशी, अधिकाऱ्यांशी बोला, जे तुम्हाला खरोखर मदत करतील.”
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com