करिअरनामा ऑनलाईन । देशातील सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी म्हटले आहे की त्यांचा उद्योग समूह अशा तरुणांना नोकरी देण्याबाबत विचार करेल जे की भारतीय सैन्याच्या प्रस्तावित “टूर ऑफ ड्यूटी” कार्यक्रमांतर्गत तीन वर्षांचा सैनिकी कार्यकाळ पूर्ण करून येतील. महिंद्रा यांनी भारतीय लष्कराला ईमेलद्वारे याची माहिती दिली आहे. ते म्हणाले,’मला नुकतेच कळाले आहे की भारतीय सैन्य ‘टूर ऑफ ड्यूटी’ या एका उत्तम ऑफरचा विचार करत आहे. याअंतर्गत तीन वर्षांसाठी भारतातील तरूण तसेच तंदुरुस्त नागरिकांना सैनिक आणि अधिकारी या नात्याने सैन्यात काम करण्याचा अनुभव घेता येईल. मला वाटते की हा ‘टूर ऑफ ड्यूटी’ कार्यक्रम ग्रेजुएट्ससाठी एक चांगला पर्याय ठरेल. खरं तर, भारतीय सैन्यात निवड आणि प्रशिक्षण या दोन्हीच्या कडक मानदंडांमुळे महिंद्रा ग्रुपला त्यांच्या उमेदवारीचा विचार करण्यास आनंदच होईल.
लष्कराच्या मुख्यालयात या ‘टूर ऑफ ड्यूटी’च्या प्रस्तावावर चर्चा होत असून त्याअंतर्गत सामान्य नागरिकांना तीन वर्षांसाठी देशाची सेवा करण्याची परवानगी दिली जाईल. हा प्रस्ताव देशातील सर्वोत्तम प्रतिभा असलेल्या तरुणांना आकर्षित करण्यासाठी म्हणून भारतीय सैन्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. यासाठी सुरुवातीला चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर या चाचणीच्या आधारावर लष्कराच्या प्रस्तावात तीन वर्षांच्या मुदतीसाठी १०० अधिकारी आणि एक हजार कर्मचार्यांचा समावेश करण्याविषयी सुचविले गेले आहे. सध्या भारतीय सैन्यात सर्वात कमी कालावधी हा शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या अंतर्गत १० वर्षांचा आहे.
तरुणांना अधिक आकर्षित करण्यासाठी शॉर्ट सर्व्हिस कमिशनचा देखील बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय लष्कराला अधिकाऱ्यांच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे आणि लवकरात लवकर त्यांना यावर मात करायची आहे. शॉर्ट सर्व्हिस कमिशनने कमीतकमी सेवा कालावधी हा पाच वर्षांपासून सुरू केला, परंतु नंतर तो अधिक आकर्षक बनविण्यासाठी १० वर्षांपर्यंत वाढविण्यात आला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.