करिअरनामा ऑनलाईन | गाव म्हटलं की (An Officer’s village in Maharashtra) आपल्या डोळ्यासमोर उभं राहणारं चित्र म्हणजे हिरवीगार शेतं, झुळझुळ वाहणाऱ्या नद्या, पक्षांचा किलबिलाट आणि मातीची घरं. प्रत्येक गावाचं काही ना काहीतरी वैशिष्ट्य असतं. कोणी एका मंदिरासाठी प्रसिद्ध असतं तर कुठलं एक गाव विशेष कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तीमुळे ओळखलं जातं. आज आपण ज्या गावाबद्दल माहिती घेणार आहोत ते मात्र या सगळ्यांपेक्षा फारच वेगळे आहे. हे कुणा एक-दोन माणसांसाठी प्रसिद्ध नसून गावातील अनेक मंडळीमुळे प्रसिद्ध झालं आहे. तर हे गाव नेमकं कुठलं? आणि काय आहे त्याची खासियत? चला जाणून घेऊया…
अधिकाऱ्यांचं गाव : सानपवाडी
महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात, पैठण तालुक्यात सानपवाडी नावाचं एक गाव आहे. या गावाची विशेषता म्हणजे हे गाव तिथल्या सरकारी नोकरदारांसाठी प्रसिद्ध आहे. या गावात केवळ ७५ घरं असून त्या घरातील ५० पेक्षा जास्त मुलं वेगवेगळ्या सरकारी नोकऱ्या करतात. या गावाची एकूण लोकसंख्या ही ४०० आहे. या सरकारी अधिकाऱ्यांपैकी एक उपविभागीय अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक, 23 पोलीस कर्मचारी, 5 शिक्षक तर 6 जणं हे भारतीय सैन्य दलात काम करतात.
या व्यतिरिक्त इथे 5 इंजिनियर्स आणि 6 डॉक्टर्स देखील आहेत. गावाला प्राप्त झालेल्या शैक्षणिक उंचीमुळे त्याला ‘अधिकाऱ्यांचं गाव’ म्हणून ओळखलं जातं. गावातील रहिवासी म्हणतात की अनेक वर्षांपासून अधिकारी होण्याची परंपरा या गावात चालत आली आहे. मग शिक्षण घेणारा विद्यार्थी मुलगा आहे की मुलगी असा भेदभाव इथे केला जात नाही. गावातील रहिवासी प्रत्येक विद्यार्थ्याच्या कर्तृत्वावर तेवढाच आनंद व्यक्त करतात. गावातील प्रत्येकालाच आपल्या शिक्षित गावाचा अभिमान वाटतो.
कशामुळे गाव झालं शिक्षण संपन्न? (An Officer’s village in Maharashtra)
सानपवडी या गावात प्रार्थमिक शाळेपासूनच मुलांना स्पर्धा परीक्षेत सहभागी होण्याची प्रेरणा दिली जाते. तसेच इथल्या शाळांमधून अनेक वेळा प्रश्नमंजुषेसारख्या स्पर्धा घेतल्या जातात. या स्पर्धा अनेक वेळा जिल्हा व तालुका पातळीवर देखील भरवल्या जातात. शाळेतील शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना अशा शैक्षणिक आवाहनांसाठी लहानपणापासूनच घडवत असतात. त्यामुळे येथील विद्यार्थी देखील अथक परिश्रम घेत यश मिळवतात. लहानपणापासूनच स्पर्धात्मक आव्हानांची सवय असल्यामुळे या गावातील विद्यार्थी अगदी सोप्या तऱ्हेने स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करून दाखवतात. आपल्या आधी यश मिळालेल्या अधिकाऱ्यांकडून प्रेरणा घेत आजही इथले विद्यार्थी परिश्रम घेत आहेत त्यामुळे ‘अधिकाऱ्यांचं गाव’ हे नाव या गावासाठी योग्यच वाटतं.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com