राज्यसेवा पूर्वपरीक्षेची तयारी करताय तर या गोष्टी लक्षात ठेवाच..

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

परीक्षा जवळ येते, तसे वेळेचे गणित त्रास द्यायला लागते. ‘माझे पेपर-दोनमध्ये साठच्यावर प्रश्न सुटत नाही किंवा जास्त सोडवण्याच्या नादात चुका जास्त होतात’, हे अगदी साधारणतः सगळयांना भेडसावणारे प्रश्न. या टिप्स नेहमी लक्षात ठेवा..

प्रश्नानुसार वेळ

समोरच्या व्यक्तीला जाणल्याशिवाय प्रेमात पडणे जसे व्यर्थ असते; तसेच ९० सेकंदांच्या प्रेमात थेट पडणे महागात पडू शकते. त्यामुळे आधीपासूनच त्या प्रयत्नात पडू नका. आधी तुम्ही तो प्रश्न सोडवण्याचा सराव करा. त्यासाठी असलेल्या वेगवेगळ्या पद्धतींची माहिती करून घ्या. याचा अर्थ तुम्ही घड्याळाकडे लक्ष द्यायचे नाही, असे नक्कीच नाही; पण जोपर्यंत तुम्हाला कोणत्या प्रश्नाला किती वेळ लागतो, तुमच्याकडून कोणता प्रश्न ९० सेकंदांमध्ये सुटू शकतो, याचा अंदाज तुम्हाला येत नाही, तोपर्यंत वेळेकडे लक्ष देऊ नये, असे मला वाटते. एकदा तुम्हाला समजले, की कोणत्या चेंडूवर एक रन काढायचा आहे आणि कशावर षटकार, की सामन्यात तुम्हीच बाजी मारणार.

काही प्रश्न अवघड असणार हे गृहीत धरून चाला..

यानंतर तुम्हाला ३० सेकंद झाल्यानंतरदेखील त्या प्रश्नाबद्दल काहीच सुचत नसेल, तर तो प्रश्न सोडून पुढच्या प्रश्नाकडे वळावे. एकाच प्रश्नाला वेळ जास्त दिल्याने तुम्हाला अचानक उत्तर येईल, असे काही नसते ; आणि तसेही पाच ते दहा प्रश्न तर अवघड असतात हे गृहीत धरून चाललेलं कधीही चांगलं.
तुम्हाला त्या प्रश्नात मार्ग सापडतो आहे, पण उत्तर नाही, अशी परिस्थिती असेल तर थोडा प्रयत्न करा परंतु एक मिनिटानंतरही प्रश्न सुटत नसेल, तर त्याला गोल करून लवकर पुढे जा. पुन्हा नंतर वेळ मिळाला, तर त्याकडे लक्ष द्या.

सोडून दिलेले प्रश्नांवर शेवटी काम करा

शेवटी काही वेळ मिळाला, तर जे प्रश्न वेळेअभावी सोडून दिले होते, त्यांना हात घालायला विसरू नका. पेपर देऊन निघून जाण्यापेक्षा शेवटच्या सेकंदापर्यंत टिच्चून खेळण कधीही चांगलं. सुटसुटीत कच्च्या कामाने नाहक चुका होण्याचे प्रमाणपण आपोआप कमी होतं.

वेळेला जवळचा मित्र बनवा

तुमच्या दैनंदिन आयुष्यात आणि परिक्षेच्या कालावधीत वेळेला महत्व द्या. गणिताचा आणि प्रश्नपत्रिका सोडवताना घडयाळ जवळ बाळगा आणि त्यानुसार प्रश्नाचं नियोजन करा. कोणता प्रश्न सोडवून कोणत्या दिशेने जायचंय ते डोक्यात ठेवा.
उदा. पक्ष्यांच्या डोक्यात जसा दिशादर्शक फिट असतो, तसं आपल्या डोक्यात वेळेचं गणित फिट झाले, की वेळ आपल्या इशाऱ्यावर आपल्या मागे येईल. तुमची वेळेमागे फरफट होणार नाही.