UGC NET Exam 2024 : UGC NET परीक्षेची नवीन तारीख झाली जाहीर; 21 ऑगस्टपासून सुरू होणार परीक्षा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (UGC NET Exam 2024) घेण्यात आलेली यूजीसी नेट परीक्षा केंद्र सरकारने रद्द केली होती. परीक्षा संपल्यानंतर अवघ्या एका दिवसातच ही परीक्षा रद्द करण्यात आली होती. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) या परीक्षेचे आयोजन केले होते. आता NTA ने यूजीसी नेट परीक्षेच्या नवीन तारखा जाहीर केल्या आहेत. नवीन वेळापत्रकानुसार ही परीक्षा आता 21 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2024 या दरम्यान होणार आहे.

का रद्द करण्यात आली होती परीक्षा?
यूजीसी नेट परीक्षा घेताना परीक्षेच्या प्रामाणिकतेशी तडजोड केल्याप्रकरणी केंद्र सरकारने ही परीक्षा रद्द केली होती. या परीक्षेला देशभरातून 9 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. परीक्षा रद्द (UGC NET Exam 2024) झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं होतं. तसंच ही परीक्षा पुन्हा कधी होणार? याकडेही विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं होतं. एनटीएने आता परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. ही परीक्षा पूर्वीच्या पेन आणि पेपर फॉरमॅटऐवजी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT) पद्धतीनं घेण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

NTA ने जाहीर केल्या इतर परीक्षांच्या तारखा (UGC NET Exam 2024)
एनटीएच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इतर परीक्षांच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार..
1. 25 ते 27 जुलै 2024 दरम्यान सीएसआयआर नेट (CSIR NET) परीक्षा घेण्यात येणार आहे. यूजीसी-नेट आणि सीएसआयआर नेट या दोन्ही परीक्षा भारतीय विद्यापीठं आणि संशोधन संस्थांमध्ये लेक्चरशिप, तसंच रिसर्च फिलोशिप घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी घेण्यात येत असतात.
2. एनसीईटी 2024 परीक्षा 10 जुलै 2024 ला घेण्यात येणार आहे. ही परीक्षा 12 जून 2024 रोजी होणार होती. परंतु ती नियोजित वेळेच्या काही तास अगोदर पुढे ढकलण्यात आली होती.
3. अखिल भारतीय आयुष पदव्युत्तर प्रवेश परीक्षा (एआयएपीजीईटी) 2024 आधीच ठरल्यानुसार 6 जुलै 2024 रोजी होणार आहे.

देशात सध्या नीटच्या पेपर लीक प्रकरणाने एकच गोंधळ उडाला आहे. विद्यार्थ्यांमध्येही परीक्षा रद्द झाल्यामुळे असंतोष निर्माण झाला होता. त्यातच काही दिवसापूर्वी यूजीसी-नेट परीक्षा रद्द (UGC NET Exam 2024) करण्यात आल्या होत्या. यावरून केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयावर जोरदार टीका करण्यात आली होती. देशामध्ये परीक्षा रद्द प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपदेखील सुरू झाले होते. विरोधकांनी नीट व यूजीसी-नेट परीक्षा रद्द झाल्यामुळे केंद्र सरकारला लक्ष्य केलं होतं.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com