करिअरनामा ऑनलाईन । कष्ट केल्याशिवाय यशाची दारं (Career Success Story) उघडत नाहीत. अनेक वेळा घरची परिस्थिती आणि आपल्यावर असलेली कौटुंबिक जबाबदारी पार पाडत आपल्याला स्वप्नाकडे वाटचाल करावी लागते. पण अनेकवेळा असं होतं की मुलांना जबाबदारीमुळे आपली स्वप्न बाजूला ठेवून अनपेक्षित क्षेत्रात जाऊन काम करावं लागतं. या गोष्टीला कोल्हापुरातील सुशांत उपाध्ये (Sushant Upadhye PSI) हा तरुण अपवाद ठरला आहे. कॉम्प्युटर इंजिनियर असलेला तरुण सुशांतने काही काळ पत्रकारिता केल्यानंतर पोलिस दलात आपले नशीब अजमावले आहे. एखाद्या कथानकाला शोभेल अशी सुशांतची कहाणी आहे.
7 व्या वर्षी अपघातात लागला मेंदूला मार
सुशांत उपाध्ये हा कोल्हापूर जोतिबाच्या डोंगरावरील (वाडी रत्नागिरी) रहिवाशी आहे. ज्योतिबा डोंगर धार्मिक आणि पर्यटन क्षेत्र असल्याने येथे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. शालेय शिक्षण झाले की युवक रोजगाराकडे वळतात. सुशांतचे वडील परंपरागत जोतीबाचे पुजारी आहेत. सुशांत फक्त 7 वर्षाचा असताना (Career Success Story) त्याचा एक अपघात झाला. या अपघातात त्याच्या मेंदूला जबर मार लागला. या मारामुळे सुशांत नेहमी शांत शांत असायचा. पुढे जाऊन हा शिक्षण घेईल की नाही अशी घरच्यांना काळजी वाटत होती. अशातच सुशांतने शालेय शिक्षणासाठी ज्योतिबा डोंगरावरीलच ज्योतिर्लिंग विद्यालयात प्रवेश घेतला. त्याच्यावर उपचार सुरु होते त्यामुळे सुरुवातीला त्याला शिक्षण घेताना त्रास झाला. नंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली आणि त्याने अभ्यासात चुणूक दाखवली. तो इयत्ता पहिलीपासूनच शाळेत अव्वल यायचा. 2007 साली झालेल्या 10 वी बोर्डाच्या परीक्षेत त्याने शाळेत 75 टक्के गुण मिळवत 1 ला क्रमांक पटकावला.
ST महामंडळातील नोकरी नाकारून पत्रकारिता केली (Career Success Story)
सुशांतने पुढेही शिकत राहायचं ठरवलं आणि २००८ साली वारणा नगर इथे महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रवेश घेतला. १२ वी नंतर त्याने कोल्हापुरातील विवेकानंद कॉलेज आणि शहाजी कॉलेजमधून BCA डिग्री घेतली. दरम्यान सुशांतने BCA करत असताना पहिल्यांदा IBPS ची परीक्षा पास केली. त्याला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली. पण त्याची आवड काही वेगळीच होती. त्याने ही नोकरी नाकारली आणि पत्रकारितेचे शिक्षण घेण्यासाठी त्यांनी शिवाजी विद्यापीठात प्रवेश घेतला. पत्रकारितेचे शिक्षण घेत असतानाच सुशांतने एका खाजगी वृत्त वाहिनीसोबत आणि जिल्हा माहिती कार्यालय येथे इंटरनशिप पूर्ण केली तर २०१७ साली एका दैनिकात त्याने काम केलं. सोबतच स्वतःची जाहिरात आणि पब्लिक रिलेशन एजन्सीही सुरू केली.
पोलीस उपनिरीक्षक पदी झाली निवड
सुशांतचे काम उत्तमरित्या सुरू होते. पण हे करत असताना त्याला स्पर्धा परीक्षा देण्याची इच्छा होती. यामुळे त्याने २०१८ साली दैनिकातील नोकरीचा राजीनामा दिला आणि तो स्पर्धा परीक्षेच्या (Career Success Story) तयारीला लागला. मुळातच अभ्यासात हुशार असलेला सुशांतने २०१९ साली MPSC ची पूर्व परीक्षा आणि नंतर मुख्य परीक्षाही क्रॅक केली. दरम्यानच्या काळात कोरोना आल्याने भरती थांबली आणि त्याला आपली शारीरिक पात्रता वाढवण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला. मुलाखत झाल्यानंतर नाशिकच्या पोलीस अॅकॅडमीत प्रशिक्षण घेत असताना त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली. पण या वेदना सहन करुन त्याने खडतर प्रशिक्षण पुर्ण केले. या प्रशिक्षणानंतर त्याची नागपूर येथे पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली.
MPSC पास झालेला गावातील पहिला तरुण
सुशांत हा त्याच्या गावातील पहिला MPSC पास झालेला तरुण आहे. त्याच्या या कामगिरीने गावात त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. जोतीबाच्या डोंगरावरच्या गरीब पुजारी कुटुंबातील मुलाचा पत्रकार ते अधिकारी हा प्रवास अनेक तरुणांना प्रेरणा देणारा ठरत आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com