Shikshak Bharti 2024 : बहुप्रतिक्षित शिक्षक भरती महत्त्वाच्या टप्प्यावर; खोट्या आश्वासनांपासून असा करा बचाव

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । दीर्घ प्रतीक्षेनंतर राज्यात शिक्षक भरती (Shikshak Bharti 2024) प्रक्रियेला अखेर मुहूर्त सापडला आहे. तब्बल 21 हजार 678 रिक्त जागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पवित्र पोर्टलच्या (Pavitra Portal) माध्यमातून जिल्हा परिषद आणि खाजगी शिक्षण संस्थांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. आता लवकरच नियुक्तीच्या याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

सुमारे 5 वर्षाचा कालावधी उलटल्यानंतर राज्यातील बहुप्रतिक्षित शिक्षक भरती आता महत्त्वाच्या टप्प्यावर पोचली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांना संस्था किंवा जिल्हा परिषदेतील नियुक्ती संदर्भात संगणकीय कामकाज सध्या सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व संगणकावर आधारित असून, त्यामध्ये (Shikshak Bharti 2024) कोणताही मानवी हस्तक्षेप होणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे; अशी माहिती राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली आहे.
अभियोग्यता धारकांमधील काही स्वयंघोषित खोडसाळ व्यक्ती तसेच काही दलाल मंडळी या प्रक्रियेबाबत संभ्रम निर्माण करत असल्याचे निरीक्षण शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी नोंदवले आहे.

खोट्या आश्वासनांपासून सावधान!!
“मी तुम्हाला जवळच्या संस्थेत नोकरी देतो, अशी खोटी आश्वासने देऊन मागील भरतीच्या वेळी काही दलालांनी उमेदवारांची फसवणूक केली असल्याची बाब काही अभियोग्यताधारकांनी केली आहे.” संगणकाद्वारे आपोआप होणाऱ्या प्रक्रियेचे श्रेय घेऊन काही मंडळी अशाप्रकारे अभियोग्यताधारकांची फसवणूक करू शकतात. या सर्व (Shikshak Bharti 2024) बाबींना आळा घालण्याचा कसोशीने प्रयत्न केला जाईल; असे मांढरे म्हणाले. दरम्यान असा खोडसाळपणा करणाऱ्या व्यक्ती किंवा संपर्कातील व्यक्ती यांच्यावर पोलिस विभागामार्फत स्वतंत्रपणे निगराणी ठेवण्यात येईल; असेही ते म्हणाले.

पोलिसात फिर्याद द्या (Shikshak Bharti 2024)
संगणकीय पद्धतीने होणाऱ्या भरतीत कोणताही मानवी हस्तक्षेप नाही. असे असतानाही दलाल अथवा अन्य मंडळी काही कृत्य करीत असतील, तर त्याचे टेलिफोन संभाषण अथवा फोटो इत्यादी पुरावे जतन करून ठेवावेत, असे आवाहन शिक्षण आयुक्तांनी केले आहे. कोणी फसवणूक करत असेल तर संबंधित पोलिस ठाण्याकडे तातडीने फिर्याद द्यावी; अशी फिर्याद दाखल केल्यास प्रशासनाकडून देखील अशा तक्रारदारास पूर्ण सहकार्य केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com